Join us

इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 09:38 IST

Exam News: इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी, बी. प्लॅनिंग या अभ्यासक्रमांची पीसीबी आणि पीसीएम, तसेच एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) आगामी शैक्षणिक वर्षापासून दोनदा घेण्यात येणार आहे.

मुंबई - इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी, बी. प्लॅनिंग या अभ्यासक्रमांची पीसीबी आणि पीसीएम, तसेच एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) आगामी शैक्षणिक वर्षापासून दोनदा घेण्यात येणार आहे. त्यानुसार यंदा पीसीबी, पीसीएम आणि एमबीए अभ्यासक्रमाची पहिली सीईटी परीक्षा एप्रिल २०२६ मध्ये, तर दुसरी सीईटी परीक्षा मे २०२६ मध्ये घेतली जाणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली. 

राष्ट्रीय स्तरावर आयआयटीसारख्या नामांकीत संस्थांमध्ये प्रवेशसाठी घेण्यात येणारी जेईई ही प्रवेश परीक्षा दोनवेळा घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा संधी उपलब्ध होते. त्याचधर्तीवर राज्यातील विद्यार्थ्यांनाही दोन संधी या परीक्षेमधून मिळणार आहेत. विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असेल. तसेच विद्यार्थ्याने दोन्ही वेळा प्रवेश परीक्षा दिल्यास दोन्हीपैकी ज्या परीक्षेत जास्त गुण असतील ते प्रवेशासाठी गृहीत धरले जातील, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. 

परीक्षांचे नियोजन सुरूउच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीईटी परीक्षासंदर्भात आढावा बैठक मंगळवारी घेण्यात आली.  या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च क्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर उपस्थित होते. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

दरम्यान, या परीक्षांचे नियोजन सीईटी सेलकडून केले जात आहे. त्यांचे सविस्तर वेळापत्रक सीईटी सेल लवकरच जाहीर करणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. यंदा पहिले वर्षच असल्याने तीन सीईटी परीक्षाच दोनवेळा घेतल्या जाणार आहे. 

एमबीबीएसची पुढील फेरी जाहीरराज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्ट्रे राउंड जाहीर केला आहे. या अभ्यासक्रमांसाठी १२ नोव्हेंबरपासून कॉलेजचे पसंतीक्रम भरण्यास सुरुवात होणार असून, १४ नोव्हेंबरला गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे, तर विद्यार्थ्यांना १५ ते १७ नोव्हेंबरदरम्यान कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यावा लागेल. राज्यात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा ८,४३५ जागा उपलब्ध असून, तिसऱ्या फेरीअखेर ८०४८ जागा, तर बीडीएसच्या २,७१८ जागा उपलब्ध असून, त्यातील २,२१० जागा भरल्या गेल्या आहेत. त्यातून एमबीबीएसच्या ३८७ आणि बीडीएसच्या ५०८ जागा रिक्त आहेत.  एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी सरकारी कॉलेजांमध्ये ४,९३६ जागा आहेत, तर खासगीमध्ये ३,४९९ जागा आहेत. यातील सरकारी कॉलेजांतील ४,८९९ जांगावर, तर खासगी ३१४९ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर सरकारीमध्ये ३७ जागांवर, तर खासगी ३५० जागा रिक्त आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Engineering, Pharmacy, MBA CET Exams Twice a Year in Maharashtra

Web Summary : Maharashtra CET exams for engineering, pharmacy, and MBA will be held twice yearly, starting April 2026. Students can appear for one or both exams, with the higher score considered. MBBS admissions' 'stray round' begins November 12.
टॅग्स :परीक्षाशिक्षण