लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मिठी नदीच्या सफाईकामामध्ये झालेल्या ६५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने गुरुवारी मुंबईत आठ ठिकाणी छापेमारी केली. या घोटाळ्यात बनावट सामंजस्य करारपत्र सादर करणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांवरही छापेमारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यापूर्वी ६ जून रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई व केरळमध्ये १८ ठिकाणी छापेमारी केली होती. त्यावेळी अभिनेता डिनो मोरियासह मुंबई महापालिकेचा अभियंता प्रशांत रामगुडे, पालिकेचा कंत्राटदार भूपेंद्र पुरोहित, व्हर्गो स्पेशालिटी कंपनीचा संचालक जय जोशी, वॉडर इंडिया कंपनीचा केतन कदम आणि डिनो मोरियाचा भाऊ सॅन्टिनो मोरया यांच्या निवासस्थानी तसेच त्यांच्याशी निगडित स्थानांवर ही कारवाई झाली होती. २००७ ते २०२१ या कालावधीमध्ये मिठी नदीच्या सफाईकामाचे कंत्राट देण्यात आले. मात्र, हे काम प्रत्यक्षात झालेच नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई महापालिकेचे तीन अधिकारी, पाच खासगी कंत्राटदार, तीन मध्यस्थ आणि एका खासगी कंपनीचे दोन कर्मचारी अशा १३ जणांविरोधात गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेअंतर्गत विशेष तपास पथकाने गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. या प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अभिनेता डिनो मोरया याचीदेखील आतापर्यंत दोनवेळा चौकशी केली आहे.