लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर ईडीने सुरू केलेली कारवाई सलग तिसऱ्या दिवशीही कायम असून शनिवारी केलेल्या कारवाई दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विविध कार्यालयांतून अनेक कागदपत्रांसह अनेक संगणक जप्त केले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तीन हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी २४ जुलै रोजी अंबानी यांच्याशी निगडित मुंबईत ३५ ठिकाणी आणि सुमारे ५० कंपन्यांवर छापेमारी केली.
या छाप्यांदरम्यान किमान कंपनीच्या किमान २५ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. ईडीच्या मुंबई आणि दिल्लीतील अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक ही कारवाई करत आहे. अंबानी यांच्या उद्योग समूहाने येस बँकेकडून २०१७ ते २०१९ या कालावधीमध्ये तीन हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, या कर्जासाठी लाचखोरी झाली तसेच या कर्जाची रक्कम काही बनावट कंपन्यांच्या माध्यमातून वळवत अफरातफरी करण्यात आल्याचा ठपका ठेवत ईडीने तपास सुरू केला आहे.
अंबानी यांच्या समूह कंपन्यांनी मनी लॉड्रिंग केल्याची माहिती नॅशनल हाऊसिंग बँक, सेबी, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ऑथोरिटी, बँक ऑफ बडोदा आणि या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या दोन एफआयआर अशी एकत्रित माहिती ईडीला देण्यात आली.
या एकत्रित माहितीच्या आधारे ईडीने गुरुवारपासून छापेमारी सुरू केली आहे. कंपनीत गुंतवणुकीच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशाचा अतिशय नियोजन पद्धतीने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अपहार केल्याचा दावा ईडीने केला आहे. त्यामुळेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील या छाप्यांदरम्यान चौकशी करण्यात आली आहे.