भावी पिढीला छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन द्या! ज्येष्ठ नाणे संग्राहक अशोक सिंह ठाकूर यांचा गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:32 IST2025-07-21T13:30:01+5:302025-07-21T13:32:12+5:30
‘जागर शिवराजाभिषेकाचा’ हा कार्यक्रम शिवाजी पार्क येथील स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहामध्ये पार पडला. यावेळी ठाकूर यांना ‘शिवसन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

भावी पिढीला छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन द्या! ज्येष्ठ नाणे संग्राहक अशोक सिंह ठाकूर यांचा गौरव
मुंबई : ‘आपल्या पुढील पिढीला एखादा छंद जोपासण्यासाठी प्रवृत्त करा. छंद अनेक प्रकारचे असतात. छंद कोणत्याही विषयाचा असो, पण भविष्यातील पिढीला एखादा छंद जोपासण्यासाठी यासाठी प्रोत्साहन द्या. छंद जोपासण्यातच एक अनोखे व्यसन आहे आणि यामुळे कोणत्याही वाईट गोष्टीचे व्यसन लागणार नाही’, असे ज्येष्ठ नाणे संग्राहक व अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांनी सांगितले.
दरवर्षी तिथीनुसार किल्ले रायगडावर शिवराजाभिषेक दिन साजरा करणाऱ्या श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड या संस्थेतर्फे रविवारी ‘जागर शिवराजाभिषेकाचा’ हा कार्यक्रम शिवाजी पार्क येथील स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहामध्ये पार पडला. यावेळी ठाकूर यांना ‘शिवसन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक आप्पा परब, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील पवार, समितीचे सर्व कार्यकर्ते आणि राज्यभरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाणे प्रदर्शन
या सोहळ्यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल दुर्मिळ सुवर्ण होनसह अनेक दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. तिथीनुसार होणाऱ्या शिवराजाभिषेक सोहळ्यादरम्यान आयोजक समितीला सहकार्य करणाऱ्या सर्व संस्थांचा सन्मानही करण्यात आला. यावेळी साहसी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे सभागृह दणाणून गेले.
शिवभक्तांचा कुंभमेळा
ठाकूर म्हणाले की, ‘शिवराजाभिषेक हा राज्यभरातून येणाऱ्या शिवभक्तांचा कुंभमेळाच आहे. हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या लोकांच्या जेवणाची सोय करणे, यासाठी लागणाऱ्या पदार्थांची मुंबईहून वाहतूक करणे, रोप-वेने गडावर आणणे आणि येथून सुमारे २ किमी अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या ठिकाणी हे सामान उचलून नेणे हे सोपे काम नाही. हे केवळ समितीच करू शकते. येथे एकात्मता पाहण्यास मिळते. सर्व लोक स्वत:च्या इच्छेने येथे येतात. आपण आपला इतिहास आणि वारसा याद्वारे संस्कृती जपली आहे. ती टिकवण्याचा आपण प्रयत्न केला नाही, तर भावी पिढी आपल्याला क्षमा करणार नाही. ज्या देशाने संस्कृती नष्ट केली, त्यांचा ऱ्हास झाला आहे.’