इंधन दरवाढीमुळे कर्मचाऱ्यांचा वेतन करार अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 18:50 IST2018-05-28T18:50:29+5:302018-05-28T18:50:29+5:30
इंधनाच्या वाढत्या दराचा परिणाम म्हणून एसटी महामंडळाच्या आर्थिक व्यवहारावर परिणाम होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा होऊ घातलेला वेतन करारही अडचणीत आला आहे.

इंधन दरवाढीमुळे कर्मचाऱ्यांचा वेतन करार अडचणीत
मुंबई : इंधनाच्या वाढत्या दराचा परिणाम म्हणून एसटी महामंडळाच्या आर्थिक व्यवहारावर परिणाम होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा होऊ घातलेला वेतन करारही अडचणीत आला आहे. महामंडळाला या अडचणीतून सोडविण्यासाठी महामंडळाच्या बसेसना पुरविण्यात येणाऱ्या डिझेलवरील राज्य सरकारचे विविध कर माफ करण्यात यावेत, अशी विनंती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मंत्री रावते यांनी मुख्यमंत्र्यांना आज यासंदर्भातील पत्र दिले. पत्रात म्हटले आहे की, सध्या दिवसेंदिवस होत असलेल्या भरमसाठ इंधन दरवाढीचा विपरित परिणाम एसटी महामंडळाच्या आर्थिक व्यवहारावर होत आहे. इंधन दरवाढीमुळे महामंडळावर वार्षिक अंदाजे ४०० कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. त्याचा परिणाम म्हणून महामंडळाचा कर्मचाऱ्यांसमवेत होऊ घातलेला वेतन करारही अडचणीत सापडला आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता एसटी महामंडळाच्या बसेसला लागणाऱ्या डिझेलवरील राज्य सरकारची करमाफी करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.