Emphasis on research rather than marketing of Ayurvedic medicines - Governor | आयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल

आयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल

मुंबई : वैद्यकीय संशोधन कार्य हे सखोल आणि सातत्यपूर्ण झाले पाहिजे. आयुर्वेदातील संशोधन जागतिक स्तरावर नेण्यासाठी त्याचे पेटंट दाखल झाले पाहिजे. आयुर्वेदिक औषधांच्या प्रसारासाठी केवळ मार्केटिंग न करता संशोधनावर अधिक भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

पुणे येथील भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या एकात्मिक कर्करोग उपचार व संशोधन केंद्राने टाटा ट्रस्ट यांच्या आर्थिक सहकार्याने तयार केलेल्या आयुर्वेदिक ‘किमो रिकव्हरी किट’चे रविवारी राज्यपालांच्या हस्त  राजभवन येथून लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्यपाल म्हणाले, किमोथेरपी झालेल्या कर्करोगग्रस्तांना अतिशय वेदना सहन कराव्या लागतात. किमो रिकव्हरी किटमधील आयुर्वेदिक औषधांमुळे त्यांना दिलासा मिळेल.
भारतीय संस्कृती दर्शनने कर्करोग उपचारासाठी आयुर्वेदिक औषधांचे ७ पेटेंट दाखल केल्याबद्दल त्यांनी संस्थेचे अभिनंदन केले. गेल्या ५०-६० वर्षांमध्ये आयुर्वेदाची उपेक्षा झाली. मात्र, आता आयुर्वेदाच्या पुनरुज्जीवनाचा काळ आहे. आयुर्वेद व आधुनिक वैद्यकशास्त्र दोघांचीही स्वतंत्र बलस्थाने आहेत. या शाखांनी एकत्रितपणे संशोधन कार्य केल्यास कर्करोगग्रस्तांना, तसेच इतर रुग्णांना त्याचा मोठा लाभ होईल. सध्या जगाला भेडसावणाऱ्या कोरोना संसर्गावरही आयुर्वेदाच्या माध्यमातून संशोधन होऊन उपचार शोधला जाईल, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Emphasis on research rather than marketing of Ayurvedic medicines - Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.