Join us

सर्वसामान्यांचे वीज बिल कमी करण्यावर भर; नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी यांची विजय दर्डा यांच्याशी चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 03:04 IST

सर्वसामान्य वीज ग्राहकाचे बिल कसे कमी करता येईल? राज्यातील उद्योगधंद्यांना वीज मिळते, पण त्यात अनेक अडचणी येतात.

मुंबई : सर्वसामान्य वीज ग्राहकाचे बिल कसे कमी करता येईल? राज्यातील उद्योगधंद्यांना वीज मिळते, पण त्यात अनेक अडचणी येतात. शेतकऱ्यांना फक्त रात्री वीज मिळते. त्यांना दिवसा कशी वीज कशी देता येईल आणि राज्याचे वीज धोरण तयार करणे यासंदर्भात लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, ऊर्जामंत्री नितीन राऊत, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यात शुक्रवारी सविस्तर चर्चा झाली. 

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून मोठ्या फरकाने विजयी झालेले दुष्यंत चतुर्वेदी यांनी शुक्रवारी विधानभवनात विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांचे आशीर्वाद घेण्यासाठी ते मुंबईतील ‘लोकमत’च्या कॉर्पोरेट कार्यालयात आले होते. यावेळी माजी आमदार कीर्तीबाबू गांधी, नितीन राऊत यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत, तसेच ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा आदी मान्यवर उपस्थित होते. माजी खासदार विजय दर्डा हे यवतमाळचे प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांच्या भेटीसाठी आल्याचे दुष्यंत चतुर्वेदी यांनी आवर्जून सांगितले.

राज्यात तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्या सरकारचे कामकाज आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर यावेळी चर्चा झाली. राज्यात, खास करून विदर्भात काँग्रेस पक्ष आणखी कसा बळकट करता येईल, याबाबतही मान्यवरांनी यावेळी विचारमंथन केले. महाराष्ट्राच्या विकासाच्या विविध मुद्द्यांचाही या चर्चेत समावेश होता. राज्याचे विजेचे धोरण ठरविण्यासाठी नेमके काय करता येईल? याविषयी यावेळी विचारविनिमय करण्यात आला.

टॅग्स :वीजविजय दर्डानितीन राऊतमहाराष्ट्र विकास आघाडी