पाडकामासाठी एल्फिन्स्टन पूल आज रात्रीपासून बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 07:55 IST2025-04-25T07:55:03+5:302025-04-25T07:55:38+5:30
शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर प्रकल्पासाठी एमएमआरडीए बांधणार नवा उड्डाणपूल

पाडकामासाठी एल्फिन्स्टन पूल आज रात्रीपासून बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली
मुंबई - परळ व प्रभादेवी परिसरास जोडणारा महत्त्वाचा एल्फिन्स्टन पूल शुक्रवारी (दि. २५) रात्री ९ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत हा पूल तोडून नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार असून, तो शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टरचा महत्त्वाचा भाग आहे.
एल्फिन्स्टन ब्रिजवरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येणार असून, ती इतर मार्गाने वळविण्यात येणार आहे. यामध्ये एल्फिन्स्टन पुलाचा वापर करून पूर्व पश्चिम दिशांना जाणाऱ्या वाहनांना पर्यायी वाहतूक मार्गांची सोय करण्यात आली आहे. तसेच काही मार्ग एकेरी करण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी नो पार्किंग झोन घोषित करण्यात आले आहे.
असे आहेत पर्यायी मार्ग
दादर पूर्वेकडून पश्चिमकडे आणि दादर मार्केटकडे जाणाऱ्या वाहनांना टिळक ब्रीजचा वापर करता येणार आहे. तर, परळ पूर्वेकडून प्रभादेवी आणि लोअर परळकडे जाणारी वाहने करी रोड ब्रीजचा वापर करतील. परळ, भायखळा पूर्वकडून प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड व सी-लिंकच्या दिशेने जाणारी वाहने चिंचपोकळी ब्रीजचा वापर करतील. प्रभादेवी व लोअर परेल पश्चिमेकडून परळला, टाटा रुग्णालय व के.ई.एम. रुग्णालय येथे जाणारी वाहनांना दुपारी ३ ते रात्री ११ या कालावधीत करी रोड ब्रीजचा वापर करता येणार आहे.
दोन रुग्णवाहिका तैनात असणार
परेल व प्रभादेवी परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णालयात जाण्या व येण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभागमार्फत दोन रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली असून, एक रुग्णवाहिका प्रभादेवी रेल्वेस्थानक पश्चिम रेल्वे पादचारी पूल येथे व दुसरी रुग्णवाहिका परळ रेल्वेस्थानक पूर्व येथे उपलब्ध असणार आहे. तसेच या रुग्णवाहिकेसोबत रुग्णांकरिता व्हिलचेअरची व्यवस्था असणार आहे.
येथे असणार नो पार्किंग
ना. म. जोशी मार्ग : कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक (आर्थर रोड नाका ) ते धनमिल नाका
सेनापती बापट मार्ग : संत रोहिदास चौक (एलफिन्स्टन जंक्शन) ते रखांगी जंक्शन
महादेव पालव मार्ग : कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारत माता जंक्शन) ते शिंगटे मास्तर चौक
साने गुरुजी मार्ग : संत जगनाडे चौक ते कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक (आर्थर रोड नाका)
भवानी शंकर मार्ग : हनुमान मंदिर, कबुतरखाना ते गोपीनाथ चव्हाण चौक
रावबहादूर एस. के. बोले मार्ग : हनुमान मंदिर ते पोर्तुगीज चर्च
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग
करी रोड रेल्वे ब्रिजवरील वाहतूक नियोजन
कॉम्रेड कृष्णा देसाई चौककडून (भारत माता जंक्शन) शिंगटे मास्तर चौककडे वाहतूक एक दिशा मार्ग :
सकाळी ७ ते दुपारी ३
शिंगटे मास्तर चौककडून कॉम्रेड कृष्णा देसाई चौकाकडे (भारत माता जंक्शन) वाहतूक एक दिशा मार्ग :
दुपारी ३ ते रात्री ११