"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 13:49 IST2025-07-05T13:46:36+5:302025-07-05T13:49:15+5:30
Sushil Kedia Apologized: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मराठी विरोधात वक्तव्य करणाऱ्या उच्चभ्रू गुंतवणूकदार सुशील केडिया यांचे कार्यालय फोडल्यानंतर त्यांनी ...

"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
Sushil Kedia Apologized: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मराठी विरोधात वक्तव्य करणाऱ्या उच्चभ्रू गुंतवणूकदार सुशील केडिया यांचे कार्यालय फोडल्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांची जाहीर माफी मागितली माफी मागितली. सुशील केडिया यांनी केलेल्या पोस्टनंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर वरळीतील त्यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. मात्र आता मी तणावाखाली येऊन मराठी विषयी वक्तव्य केल्याचे म्हणत सुशील केडिया यांनी माफी मागितली आहे. तसेच धमकी नाही तर प्रेम लोकांना एकत्र आणते, असेही सुशील केडिया म्हणाले.
सुशील केडिया यांनी एक्स पोस्टवर व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली. मी राज ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी माझ्या नम्र विनंतीचा विचार करावा, असं केडिया म्हणाले. "माझे ट्विट चुकीच्या मानसिक स्थितीत तणावाखाली झाले होते आणि त्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. मराठी न जाणणाऱ्यांवर झालेल्या हिंसाचाराच्या दबावाखाली येऊन मी अतिरेकी प्रतिक्रिया दिली. मला जाणीव आहे की मला माझ्या प्रतिक्रिया मागे घ्याव्या लागतील आणि माघार घ्यावी लागेल. सत्य हेच आहे की, मुंबईत ३० वर्षांहून अधिक काळ राहूनही, मूळ मराठी वंशाच्या व्यक्तीकडे जी कार्यक्षमता असू शकते ती मी साध्य करू शकलो नाही. जर मला माझ्या मराठी बोलण्याच्या गुणवत्तेबद्दल खात्री नसेल, तर आणखी भीती वाटते की जर मी कोणताही शब्द चुकीच्या पद्धतीने बोललो तर अधिक हिंसाचार होईल. मुद्दा समजून घ्या. धमकी नाही तर प्रेम लोकांना एकत्र आणते," असं केडिया यांनी पोस्टमध्ये म्हटलं.
I request @RajThackeray Ji to consider my humble submission. pic.twitter.com/i8zGszgNtW
— Sushil Kedia (@sushilkedia) July 5, 2025
"राज ठाकरे यांच्याबद्दल मला नेहमीच खूप आदर आणि कृतज्ञता वाटत आली आहे कारण ते ठाम मुद्द्यांवर उभे राहतात, आपल्या सर्वांच्या चिंता असलेल्या मुद्द्यांवर ते ताकदीने उभे राहतात. ते नेहमीच एक नायक राहिले आहेत. पण यावेळी जेव्हा आपलेच लोक आपापसात भांडू लागले तेव्हा मी वेडा झालो. मी त्यांचा चाहता आहे, एक उत्कट फॉलोअर आहे आणि त्यांच्याबद्दल नियमितपणे सकारात्मक ट्विट करत असतो. परंतु अशा परिस्थितीत जिथे आपलेच लोक आपल्याच लोकांना दुखावत आहेत, त्यावेळी माझ्या भावनिक अतिरेकी प्रतिक्रिया मी व्यक्त केल्या. जेव्हा आपलेच लोक आपल्याला घाबरवतात तेव्हा सर्वत्र चुका होऊ लागतात. माझी चूक मी स्विकारतो. मी आशा करतो की जे हे वातावरण शांत करण्याचे आणि मराठी सहजतेने स्वीकारू शकण्याचे काम करु शकतील त्यांनी ते करावं. मी त्यांचा आभारी असेल," असं केडिया म्हणाले.
दरम्यान, मीरा रोडमध्ये दुकानदाराला झालेल्या मारहाणीनंतर शेअर मार्केटमधील 'केडियोनॉमिक्स' कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील केडिया एक्स पोस्ट करत राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. "राज ठाकरे हे लक्षात ठेवा, मी गेल्या ३० वर्षांपासून मुंबईत राहत असूनही मला मराठी नीट येत नाही. आता, तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी असा निश्चय केला आहे की, मी मराठी शिकणार नाही. मी अशी प्रतिज्ञा करतो. क्या करना है बोल?" असं केडिया म्हणाले होते.