पात्र, अपात्र धारावीकरांना धारावीतच घर; पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार: मुख्यमंत्री फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 06:25 IST2026-01-11T06:24:37+5:302026-01-11T06:25:48+5:30
कोणत्याही खासगी व्यक्तीला पुनर्विकासाचे काम देण्यात येणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पात्र, अपात्र धारावीकरांना धारावीतच घर; पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार: मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाला राज्य सरकारने स्पेशल प्रोजेक्टचा दर्जा दिला आहे. राज्यातील हा असा पहिला प्रकल्प आहे की जेथील पात्र यांना घरे मिळणारच आहेत. मात्र, जे अपात्र आहेत त्यांनाही धारावीतच घरे दिली जाणार आहेत. महापालिका निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथे भूमिपूजन करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी धारावी येथे प्रचार सभेत केली.
भाजप, शिंदेसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, धारावी हा देशातील झोपडपट्टीचा विभाग म्हणून अनेकांना माहीत आहे. पण, याच धारावीत अनेक कारखाने आहेत. कुंभारवाड्यात होणारे काम, चांभारवाड्यात होणाऱ्या कामाची कलाकुसर वेगळीच आहे. अनेक उत्तम दर्जाच्या गोष्टी धारावीत तयार होतात. इथल्या लोकांच्या पुनर्विकासाची चर्चा अनेक गेल्या वर्षांपासून होत असली तरी, मोदी सरकारने धारावीच्या पुनर्विकासाचा प्रश्न हाती घेतला. रेल्वेची जमीन मिळवून विकास हाती घेतला आहे.
धारावीत राहणाऱ्यांचे जीवनमान सुधारले पाहिजे, या भावनेतून सोसायटीलाही लाजवेल असे रिहॅब निर्माण करणार आहे. इथल्या व्यावसायिकांना आहे त्याच ठिकाणी अधिक चांगल्या व्यवस्था उभ्या करून देणार आहोत. येथील पुनर्विकासानंतर व्यवसायाला जागा मिळाल्यापासून पुढील पाच वर्षे सगळे कर माफ केले जाणार आहेत. कोणत्याही खासगी व्यक्तीला पुनर्विकासाचे काम दिले जाणार नाही. डीआरपीमध्ये सरकारचा सहभाग असून यात धारावीकरांची मालकी कायम ठेवली आहे, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.