Join us  

Elgar Morcha LIVE : प्रकाश आंबेडकरांसहीत 10 जणांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 8:09 AM

मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी प्रकाश आंबेडकर आझाद मैदानातून रवाना

मुंबई -  कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारिप-बहुजन महासंघानं एल्गार मोर्चाचं आयोजन केले आहे. जिजामाता उद्यान ते विधान भवन दरम्यान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, भारिपच्या एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तर दुसरीकडे, आझाद मैदानावरील आंदोलनास पोलिसांकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आझाद मैदानावर आंदोलक जमण्यास सुरुवात झाली आहे.  थोड्याच वेळात आंदोलन सुरुवात होणार आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आझाद मैदानात दाखल झाले आहेत. 

LIVE UPDATES

- मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी प्रकाश आंबेडकर आझाद मैदानातून रवाना 

  • 12:26 PM : मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्रकाश आंबेडकरांना चर्चेचं निमंत्रण,शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार.

- संभाजी भिडेंना मोदी सरकार जावयासारखी वागणूक का देत आहे? - प्रकाश आंबेडकर

- संभाजी भिडेंची अटक टाळण्यात नरेंद्र मोदींचा हस्तेक्षप - प्रकाश आंबेडकर

- प्रकाश आंबेडकर आझाद मैदानात दाखल

एल्गार मोर्चासाठी आंदोलकांची सीएसएमटी स्थानकाजवळ गर्दी, दंगल नियंत्रण पथक मोर्चाच्या ठिकाणी तैनात

सीएसएमटी स्थानकात आंदोलकांची गर्दी झाली आहे.  पोलीस आंदोलनकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सरकारने घोटला लोकशाहीचा गळा, एल्गार मोर्चा निघणारच! - प्रकाश आंबेडकर

दरम्यान,  ''मुंबईतील एल्गार मोर्चाला परवानगी नाकारून सरकारने लोकशाहीचा गळा घोटला असून, आंदोलन करण्याचा अधिकार नाकारण्याचे काम सरकारकडून होत आहे. पोलिसांच्या आडून सरकारच ‘गोळी’ चालवत आहे. एल्गार मोर्चासाठी महाराष्ट्रातून नागरिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते आता परत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे सोमवारचा एल्गार मोर्चा निघणारच'', अशी भूमिका भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी मांडली. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी, सोमवारी जिजामाता उद्यान ते विधान भवन दरम्यान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, पोलिसांनी ऐन वेळी मोर्चाला परवानगी नाकारली. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना आंबेडकर यांनी पोलीस आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर टीका केली.

परवानगी नाकारायचीच होती, तर ती आधीच नाकारायची होती. आता मोर्चासाठी राज्यातून लोक निघाले आहेत. त्यांना परत पाठविता येणार नाही. जिजामाता उद्यानातून मोर्चाला सुरुवात करायचे आमचे नियोजन होते. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारून ते विस्कटवले. आता आम्ही थेट सीएसएमटीला जमणार आणि तिथेच काय तो निर्णय घेणार. आता नियंत्रण करणे आमच्या हातात नाही. सोमवारी जे काही होईल, त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. सरकारने अजूनही आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मिलिंद एकबोटेंच्या अटकेनंतर संभाजी भिडे यांनाही अटक होईल, अशी अपेक्षा होती, परंतु सरकारकडून कोणतीच हालचाल नाही. ज्यांनी मार खाल्ला त्यांच्यावर बंदी घातली जात आहे, तर मारणारे मोकाट फिरत आहेत, अशी टीकाही प्रकारश आंबेडकरांनी केली. ‘मला कोणतेही मंत्रिपद कधीच नको होते. त्यामुळे माझ्याबाबत कुणाला राजकीय भीती बाळगण्याचे कारण नाही. या सरकारने आणि आधीच्या सरकारनेही मला मंत्रिपदाची आॅफर दिली होती,’ असेही आंबेडकर या वेळी म्हणाले.संभाजी ब्रिगेडचा मोर्चाला पाठिंबासंभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी निघणाऱ्या एल्गार मोर्चाला संभाजी ब्रिगेडने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या मोर्चात ब्रिगेड आपल्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण तयारीनिशी आणि ताकदीनिशी उतरणार असल्याचे, ब्रिगेडचे पुणे अध्यक्ष संभाजी शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :एल्गार मोर्चाप्रकाश आंबेडकरसंभाजी ब्रिगेडभीमा-कोरेगाव