electricity Problem in Mumbai | मुंबईतील विजेचे आयलॅण्डिंग गॅसवरच, पुढील चार वर्षांत निम्मी वीज बाहेरून आणावी लागण्याची भीती

मुंबईतील विजेचे आयलॅण्डिंग गॅसवरच, पुढील चार वर्षांत निम्मी वीज बाहेरून आणावी लागण्याची भीती

मुंबई :मुंबईकरांची विजेची वाढती मागणी वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांना पूर्ण करणे अशक्य होत असल्याने अन्य स्रोतांकडून मिळणाºया विजेवरील अवलंबित्व वाढू लागले आहे. मागणी आणि पुरवठा यांच्यातली ही तूट भविष्यात वाढतच जाणार असल्याने अखंडित वीजपुरवठ्यासाठी आवश्यक असलेले आयलॅण्डिंग वीज कंपन्यांसाठी आव्हानात्मक ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

वीज प्रकल्पांतील वीजनिर्मितीत वाढ आणि वीज वहन करणाऱ्या नेटवर्कचे सक्षमीकरण हे दोनच पर्याय हा संभाव्य ‘अंधार’ टाळू शकतो, असे वीज क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. विजेची मागणी आणि पुरवठा यांच्यातील समतोल राखत ग्रीडमधील फ्रिक्वेन्सी कायम राखणे हे मोठे आव्हान असते. ही फ्रिक्वेन्सी ४८.५ इतकी कमी झाली की पुरवठा कमी करून म्हणजेच लोडशेडिंगद्वारे ती वाढवावी लागते. ती ४७.५ इतकी कमी झाली की वीजनिर्मिती करणारे जनरेटर्स बंद पडतात. आयलॅण्डिंग फसल्याचाही प्रकार घडतो. गेल्या सोमवारी त्यामुळेच मुंबई भरदिवसा काळोखात बुडाली होती.

यलॅण्डिंगची संकल्पना १९८१ साली मुंबईत आली. २००९ पर्यंत मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडील वीज आणि ग्राहकांच्या मागणीत तफावत नसल्याने आयलॅण्डिंग करण्यात अडसर येत नव्हता. मात्र, मागणी वाढू लागल्यानंतर बाहेरून मुंबईत वीज आणण्याचे प्रमाण वाढू लागले. सध्या ११०० मेगावॅट अतिरिक्त वीज मुंबईला लागत असून पुढील तीन ते चार वर्षांत मुंबईची जवळपास निम्मी वीज बाहेरून आणावी लागेल. त्यामुळे मागणी-पुरवठ्यातला समतोल राखत आयलॅण्डिंग करण्याचे मोठे आव्हान वीज वितरण कंपन्यांसमोर असेल, अशी माहिती वीज अभ्यासक अशोक पेंडसे यांनी दिली. ते गणित जेव्हा जेव्हा फसेल तेव्हा शहर काळोखात बुडेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

सबस्टेशन, अंडरग्राउंड सर्किटवर भिस्त
मुंबईत ४०० केव्ही वीज वहनासाठी नेटवर्क नसल्याने कळव्यानंतर ती वीज २२० केव्ही वाहिन्यांवरून मुंबईत दाखल होते. त्यामुळे विक्रोळी येथील ४०० केव्हीच्या सबस्टेशनची उभारणी ही काळाची गरज आहे. त्यात १० वर्षे दिरंगाई झाली असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुढील तीन वर्षांत हे काम पूर्ण होईल. नव्याने प्रस्तावित केलेले कुडूस-बोरीवली अंडरग्राउंड सर्किट हेसुद्धा मुंबईकरांचे वीज संकट दूर करण्यास उपयुक्त ठरेल.
- अशोक पेंडसे, वीज अभ्यासक
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: electricity Problem in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.