Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘इलेक्ट्रिक वाहनांना लवकरच मिळणार टोल सवलत’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 01:33 IST

Aaditya Thackeray : समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे आदी ठिकाणी प्राधान्याने ही कामे करता येतील, अशा सूचना या वेळी मंत्री ठाकरे यांनी दिल्या.

मुंबई : भविष्यात पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास चालना देणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने शासनामार्फत या वाहनांसाठी आतापर्यंत विविध सवलती देण्यात आल्या आहेत. याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमध्ये काही सवलत देता येऊ शकेल का याबाबत विचार करावा, अशी सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

समृद्धी महामार्गासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडील विविध महामार्गांवर वृक्षारोपण, सौरऊर्जेचा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंगसह इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास चालना देणे तसेच समृद्धी महामार्गाच्या बांधकामामध्ये औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्रांमधील फ्लाय ॲशचा वापर करणे या अनुषंगाने सोमवारी ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. महामार्गांचा पर्यावरणपूरक विकास करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना या वेळी मंत्री ठाकरे यांनी दिल्या.

औष्णिक वीज प्रकल्पातून उत्सर्जित होणाऱ्या राखेचा वापर रस्ते बांधकामात केल्यास मोठ्या प्रमाणात प्रदूषण नियंत्रण करता येईल. तसेच महामार्गाचे बांधकाम करतानाच त्यावर सौरऊर्जेचा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच महामार्गाच्या दुतर्फा आणि विभाजक आदी ठिकाणी वृक्षारोपण करणे आदी कामांवर भर देण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.  समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे आदी ठिकाणी प्राधान्याने ही कामे करता येतील, अशा सूचना या वेळी मंत्री ठाकरे यांनी दिल्या. 

टॅग्स :आदित्य ठाकरेटोलनाका