Electric shock will give a great deal! A 5 percent hike proposal submitted to MERC | महावितरण देणार विजेचा झटका! २० टक्के दरवाढीचा प्रस्ताव एमईआरसीकडे सादर

महावितरण देणार विजेचा झटका! २० टक्के दरवाढीचा प्रस्ताव एमईआरसीकडे सादर

मुंबई/सांगली : महावितरणने वार्षिक तोटा भरून काढण्यासाठी व्यापारी, घरगुती ग्राहकांसाठी २०२०-२१ वर्षासाठी ५ ते ८ टक्के वीज दरवाढ, तर स्थिर आकारात ११ ते ३३ टक्के वाढीचा प्रस्ताव वीज नियामक मंडळापुढे ठेवला आहे. वीज दरवाढ मंजूर झाल्यास ग्राहकांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. लघुदाब कृषिपंपाच्या वीजदरात वाढ नसली तरी, स्थिर आकारात ५ ते ६ टक्के वाढ होणार आहे.

महावितरणने येत्या पाच वर्षांतील महागाईचा अंदाज बांधून, त्यादृष्टीने वीजदर व स्थिर आकारवाढीचा प्रस्ताव प्रसिद्ध केला आहे. वीज खरेदी खर्च, संचलन व सुव्यवस्थेचा खर्च, दीर्घ मुदतीच्या कर्जाचे व्याज भागविणे, बुडित रकमेसाठीच्या तरतुदीसह अन्य एकत्रित खर्च आणि उत्पन्नाच्या आकड्यांच्या खर्चाचा कुठेही मेळ बसत नाही. म्हणूनच महावितरणने वीज नियामक मंडळाकडे सामान्य वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. महावितरणने २०१९ ते २०२० या वर्षात २ हजार २८८.१९ कोटी तोटा झाल्याचे दर्शविले आहे.
स्थिर आकारातही मोठी वाढ आहे

२०२०-२१ या वर्षासाठी घरगुती ग्राहकांसाठी वीज दरवाढ ५ ते ८ टक्के आणि स्थिर आकारामध्येही ११ ते ३३ टक्के वाढीचा प्रस्ताव आहे. सर्वाधिक दरवाढ घरगुती आणि व्यापारी ग्राहकांसाठीच दिसत आहे. ० ते १०० युनिटच्या ग्राहकांना ११ टक्के, १०१ ते ५०० युनिटसाठी २२ टक्के, ५००च्या पुढील युनिटचा वापर असणाऱ्या ग्राहकांवर स्थिर आकाराचा बोजा ३३ टक्केंनी वाढविला आहे. ग्राहकांच्या हरकतींवर सुनावणी होऊन १ एप्रिल २०२० पासून प्रस्तावित वीज दरवाढ लागू होणार आहे.

महावितरण म्हणते...
महसुली तूट कमी करण्यासाठी विविध वर्गवारीतील ग्राहकांचा स्थिर व विद्युत आकार सुधारणेचा प्रस्ताव दाखल केला आहे. वीजनिर्मिती खर्चातील वाढ, पारेषण खर्चातील वाढ, रेग्युलेटरी अ‍ॅसेट्स, तसेच महावितरणच्या वैध खर्चातील वाढ इत्यादी कारणांमुळे वीजदरात बदल करणे गरजेचे आहे. महावितरणच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या अतिरिक्त खर्चामुळे महसुली तूट निर्माण झाली आहे.

सरासरी १ ते ५ टक्के वाढ दिसत असली तरी प्रस्तावित दरवाढ २० टक्क्यांहून अधिक आहे. आताचा दर ते ६ रुपये ७३ पैसे दाखवित आहेत. पाचव्या वर्षी ८ रुपये १० पैसे दाखवित आहेत. शेतकरी वर्गाची जी ३३ हजार कोटींची थकबाकी दाखविली आहे, ती बोगस आहे. सरसकट सगळ्या वीजदरात वाढ आहे. उद्योगांचे आताचे दर २० टक्के तर ४० टक्के जास्त आहेत. घरगुती, औद्योगिक आणि व्यापारी हे तिन्ही प्रमुख वीजदर देशात सर्वात जास्त आहेत. ही दरवाढ लादली गेली, तर उद्योगधंद्यांची वाट लागेल. - प्रताप होगाडे, वीजतज्ज्ञ

Web Title: Electric shock will give a great deal! A 5 percent hike proposal submitted to MERC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.