Join us  

मुंबईच्या रस्त्यांवर आजपासून धावणार इलेक्ट्रिक एसी बेस्ट बस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 1:28 AM

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्ट उपक्रम घेणार आहे.

मुंबई : बेस्ट उपक्रमाची पहिली पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक वातानुकूलित बस सेवा सोमवारपासून मुंबईत सुरू होणार आहे. पूर्व उपनगरातील प्रतीक्षानगर ते सायन-मुलुंडपर्यंत ही बस चालविण्यात येणार आहे. बस मार्ग क्रमांक ३०२ यासाठी निश्चित करण्यात आला आहे. सहा वातानुकूलित व चार विनावातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्ट उपक्रम घेणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात आल्या. परंतु, प्रादेशिक वाहतूक कार्यालयातून हिरवा कंदील न मिळाल्यामुळे या बसगाड्या बस आगारांमध्ये धूळ खात पडल्या होत्या. अखेर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे बेस्ट उपक्रमाकडून एलबीएस मार्गावरून सायन ते कुर्ला अशी ही बस चालविण्यात येईल. कमानी, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप असा प्रवास करीत हा बस मार्ग मुलुंड येथे संपेल. हा मार्ग वर्दळीचा असून येथे बसची मोठ्या प्रमाणात मागणी होती. या बसगाडीचे चार्जिंग स्टेशन धारावी बस आगारात असणार आहे. एकदा चार्ज केल्यास ही बस संपूर्ण दिवस चालेल.

मोबाइल अ‍ॅपचेही उद्घाटनकोणती बस कुठून कुठे जाते? बसथांब्यावर गाडी येण्याची वेळ, वाहन चालकांचे रेटिंग, कोणती बस जलद गतीने इच्छित स्थळी पोहोचवू शकते, आदी माहिती देणारे मोबाइल अ‍ॅपही आजपासून मुंबईकरांना वापरता येणार आहे.

सहा वातानुकूलित व चार विनावातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. वातानुकूलित बसचे प्रवासी भाडे सहा रुपये प्रति पाच किलोमीटर, विनावातानुकूलित बसगाडीचे पाच रुपये तिकीट असणार आहे. तसेच वातानुकूलित बसचे कमाल भाडे २५ आणि विना वातानुकूलित बसचे भाडे २० रुपये असणार आहे.

 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाबेस्टइलेक्ट्रिक कार