राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 07:54 IST2025-12-14T07:53:46+5:302025-12-14T07:54:34+5:30
जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान

राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपूर, चंद्रपूर या दोन महापालिकांची निवडणूक आरक्षण मर्यादेच्या मुद्यामुळे नंतर होईल आणि अन्य २७ महापालिकांची निवडणूक एकत्रित होईल, असे म्हटले जात असले तरी सर्व २९ महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. साधारणतः जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात त्यासाठीचे मतदान होईल, असे म्हटले जात आहे.
नागपूर आणि चंद्रपूर, या दोनच महापालिका अशा आहेत की, जिथे ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे येथे आधी ५० टक्क्यांच्या आत आरक्षण दिले जाईल, अशा पद्धतीने पुनर्रचना करून मगच तेथे निवडणूक घेतली जाईल, असा तर्क होता. मात्र, आयोगाच्या सूत्रांनी त्याचा इन्कार केला. ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे, अशा ठिकाणी निवडणूक घेऊ नये, असे न्यायालयाने निकालात कुठेही म्हटलेले नाही. ही मर्यादा ओलांडलेल्या महापालिकांमध्ये निवडणूक घेता येईल आणि निकालदेखील जाहीर करता येईल; पण हा निकाल ओबीसी आरक्षण आणि ५० टक्क्यांची ओलांडलेली मर्यादा याबाबत न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल.
भाजपच्या मुलाखती सुरू
भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती विविध महापालिकांमध्ये सुरू झाल्या आहेत. प्रत्येक नगरसेवकपदासाठीचे तीन नावांचे पॅनल तयार करून ते प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात येणार आहे.
एकेका जागेसाठी किमान दहा ते वीसपर्यंत अर्ज आले असल्याने त्यातून निवड करण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. एकाला संधी देताना अन्य कोणी बंडखोरी करणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.
निवडणूक अधिकारी ठरले
राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांनी महापालिकांना निवडणूक अधिकारी आणि सहायक अधिकारी उपलब्ध करून द्यावेत, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला होता. त्यानुसार या अधिकाऱ्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
भाजपचे पहिले सर्वेक्षण महापालिका
निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने पहिले सर्वेक्षण पूर्ण केले आहे. एका नामवंत कंपनीने हे सर्वेक्षण केले आहे. तीन-तीन उमेदवारांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून निश्चित केली जाणार आहेत. ही नावे निश्चित झाल्यानंतर त्यांच्यापैकी एकाचे नाव निश्चित करण्यासाठी दुसरे सर्वेक्षण केले जाणार आहे.
काँग्रेसने अर्ज मागविले
काँग्रेसनेदेखील अर्ज मागविणे सुरू केले आहे. १५ डिसेंबरपर्यंत स्थानिक पातळीवर इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मित्रपक्षांबरोबर आघाडीची वाट न पाहता प्रत्येक महापालिकेतील सर्व जागांसाठी अर्ज मागविले आणि मुलाखतीही घेतल्या जातील.
भाजप इतर राज्यांतील नेत्यांना मुंबईत आणणार
मुंबईमध्ये उत्तर भारतीय, गुजराथी आणि दाक्षिणात्य मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजराथ, तमिळनाडू, कर्नाटकातील भाजपच्या प्रमुख नेत्यांना मुंबईच्या मैदानात उतरविले जाणार आहे. त्यांच्या जाहीर सभा तसेच बैठकादेखील घेतल्या जाणार आहेत.
अजित पवार गटाचे काय?
राज्यात सत्तेत असलेल्या तीन पक्षांपैकी भाजप आणि शिंदेसेना यांच्यात महापालिकेसाठी युती होईल, असे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले असून त्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात बैठकही झाली आहे.
मात्र, अजित पवार गटाला सोबत घेण्याबाबत भाजपकडून अद्याप कोणतीही हालचाल नाही. अजित पवार गटाला सोबत घेऊ नका असा भाजपच्या काही प्रभावी नेत्यांचा आग्रह आहे असे समजते.
१५ डिसेंबरनंतर घोषणा ? : राज्य
निवडणूक आयोग १५ डिसेंबरनंतर केव्हाही २९ महापालिकांची निवडणूक जाहीर करील. त्याचवेळी नागपूर आणि चंद्रपूरचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल, हे स्पष्ट करणार आहे.