Join us

"येत्या दोन तीन महिन्यांत निवडणुकाही लागू शकतात," निकालानंतर उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 21:16 IST

हा निकाल लोकशाहीच्या दृष्टीनं घातक असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगानं यासंदर्भातील निर्णय दिला. भारतीय निवडणूक आयोगानं शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवलं आहे. यानंतर हा निकाल लोकशाहीच्या दृष्टीनं घातक असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. 

““आज जी मिंधे गटाची आणि जगातील सर्वात मोठ्या पक्षाची दयनीय अवस्था झाली आहे. त्यांना स्वत: लढण्याची हिंमत नाही. मी अनेकदा त्यांना आव्हान दिलंय. आता मला अशी शक्यता वाटतेय त्यावरून आता असं वाटायला लागलंय की कदाचित येत्या महिन्या दोन महिन्यात महापालिकेच्या निवडणुकाही जाहीर होऊ शकतील. त्यांना कोणत्याही परिस्थितीत महापालिका जिंकायची आहे. मुंबईच्या हातात भिकेचा कटोरा देऊन दिल्लीश्वरांच्या दारी उभी करायची आहे. कदाचित आमचं मशाल चिन्ह ते देखील ते घेतील,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील हे नक्कीच वाटतं. त्यासाठीच हा निकाल ठरवून दिला आहे. दोन पाच दिवसांत जरी महापालिका निवडणुका लागला तरी आश्चर्य वाटणार नाही. आम्ही याच्याशी मर्दासारखे लढणार असल्याचेही त्यांनी म्हटलं.

हा सगळा ठरवलेला कट"रामाकडे, रावणाकडे धनुष्यबाण होता. पण विजय रामाचा झाला. सत्याचा विजय नेहमी होत आला आहे. अन्यायाविरोधात जे पेटून उठलेत त्यांचा विजय होईल. हा अत्याचार लोकशाहीवर होतोय. हा छत्रपतींचा महाराष्ट्र, धुतराष्ट्राचा नाही. या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. अपात्रतेबाबत घटनातज्ञांनुसार सदस्यांचे अपात्र होऊ शकतात. हा ठरवलेला कट आहे का? धनुष्यबाण ओरबाडून घेण्याचा प्रयत्न केला तरी ओरबाडून घेऊ शकत नाही. नामर्द कितीही माजला तरी तो मर्द होत नाही," अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर केली. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनानिवडणूक