निवडणूक आली, आता तरी शिवाजी पार्कची डागडुजी करा; धूळ अन् तुटलेल्या कठड्यांमुळे गैरसोय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:41 IST2025-11-06T14:40:54+5:302025-11-06T14:41:29+5:30
वाढलेले गवत आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये संताप

निवडणूक आली, आता तरी शिवाजी पार्कची डागडुजी करा; धूळ अन् तुटलेल्या कठड्यांमुळे गैरसोय!
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राजकीय आखड्यासोबतच ज्येष्ठ नागरिक, बालमित्र यांच्या विरंगुळ्याचे ठिकाण, अशी ओळखल्या असलेल्या दादर येथील शिवाजी पार्क मैदानाची दुरवस्था झाली आहे. मैदानाच्या परिसरातील बैठक व्यवस्था, कठडे तुटलेले आहेत. मैदानातील धूळ उडत असल्याने परिसरातील रहिवासी तसेच खेळाडू त्रस्त आहेत. काही शिल्पांची रया गेली आहे. वाढलेले गवत आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून नगरसेवक नसल्याने शिवाजी पार्क मैदानाकडे कोणाचेही लक्ष नाही. महापालिकेचे अधिकारी देखील काम करत नाहीत. त्यांच्यावर कुणाचा वचक राहिलेला नाही. परिणामी या मैदानाची दुरवस्था झाली आहे.
-संदीप देशपांडे, नेते, मनसे
गेल्या ५३ वर्षे मी येथे राहत आहे. येथील रस्ते आणि फूटपाथवर चालता येत नाही. सतत उडणारी धूळ, वेगवेगळ्या सभा आणि इतर कार्यक्रमांमुळे या मैदानाची वाट लागली आहे. आता महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे आता तरी मैदान नीट करावे.
-अशोक पेंडसे, शिवाजी पार्क, दादर
मैदानातील तुटलेली बैठक व्यवस्था, ओबडधोबड फुटपाथ, तुटलेले कठडे यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. मैदानात वाहने गेल्याने अवस्था वाईट आहे. गवत वाढले आहे. कित्येक समस्या आहेत. सभोवताली लावलेली शिल्पे तुटलेली आहेत. त्यावरील रंगकाम उडाले आहे.
-सुदर्शन मंडलिक, दादर
छत्रपती शिवाजी पार्कात सकाळी, सायंकाळी जॉगिंगसाठी ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर येतात. येथे सतत धूळ उडत असते. शिवाय अस्वच्छता असते. लगतचा कठडा, बैठक व्यवस्था नीट नाही. पाणपोई आहे, पण पाणी नाही. या समस्या सुटल्या पाहिजेत.
-गजानन नागे, दादर