सरपंचपदाचा लिलाव करणाऱ्या गावांना निवडणूक आयोगाचा दणका, ग्रामपंचायत निवडणूक रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 07:20 PM2021-01-13T19:20:21+5:302021-01-13T19:25:50+5:30

Grampanchayat Election Update : नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाला होता

Election Commission strikes villages auctioning Sarpanch posts, cancels Gram Panchayat elections | सरपंचपदाचा लिलाव करणाऱ्या गावांना निवडणूक आयोगाचा दणका, ग्रामपंचायत निवडणूक रद्द

सरपंचपदाचा लिलाव करणाऱ्या गावांना निवडणूक आयोगाचा दणका, ग्रामपंचायत निवडणूक रद्द

Next

मुंबई - राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच काही ग्रामपंचातींमध्ये सरपंच तसेच सदस्यपदांसाठी चक्क लिलाव जाहीर करू बोली लावण्यात आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणी कठोर कारवाई करत पदांची बोली लावणाऱ्या गावांना दणका दिला आहे. निवडणूक आयोगाने सरपंच आणि सदस्यपदांसाठी बोली लावणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील उमराणे आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी या गावातील ग्रामपंचायत निवडणूक रद्द केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

मदान यांनी सांगितले की, उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचबरोबर आयोगाकडे तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने आयोगाने अहवाल मागविले होते. जिल्हाधिकारी, निवडणूक निरीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांचा अहवाल; तसेच विविध कागदपत्रे आणि ध्वनिचित्रफितींचे अवलोकन केल्यानंतर या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. खोंडामळी येथील लिलावाप्रकरणी आधीच नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता अधिक तपास करून भारतीय दंड विधानाचे कलम 171 (क) अथवा अन्य कायद्यांतील तरतुदींनुसार संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करून आयोगास अहवाल सादर करावा, असे निर्देश नाशिक आणि नंदुरबारचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.

काही ग्रामस्थांच्या एकतर्फी दबावात्मक निर्णयामुळे इच्छूक उमेदवारांना मुक्त वातावरणात निवडणूक लढविण्यापासून आणि मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार या दोन्ही गावांमध्ये झाला आहे. यातून लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचे आणि आचारसंहितेचे भंग झाल्याचे सकृतदर्शनी सिद्ध होत आहे. अशा प्रकारांमुळे निवडणूक लढविण्याची सर्वांना समान संधी प्राप्त होऊ शकत नाही. हे प्रकार टाळण्यासाठी निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात निवडणूक घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे. ही संविधानात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी आयोगाने या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, असेही मदान यांनी सांगितले.

 

 

Web Title: Election Commission strikes villages auctioning Sarpanch posts, cancels Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.