मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 07:40 IST2025-10-30T06:33:08+5:302025-10-30T07:40:53+5:30
चक्रानुक्रमे पहिलीच निवडणूक

मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक बुधवारी जाहीर केले आहे. महापालिकेची ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत काढली जाणार आहे. आयोगाने महानगरपालिकेला आरक्षण प्रक्रियेचे टप्पे निश्चित करून ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पार पाडणे बंधनकारक आहे.
निवडणूक जानेवारीपूर्वी?
राज्य निवडणूक आयोगाने सोडतीची प्रक्रिया पारदर्शक आणि लोकाभिमुख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ही संपूर्ण प्रक्रिया निश्चित वेळापत्रकानुसार पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जानेवारी २०२६ पूर्वी होईल, हे आता स्पष्ट झाले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या या आदेशानंतर मुंबईतील राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि मुंबईकरांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत अर्थातच उत्सुकता निर्माण झाली आहे.
सोडतीचा कार्यक्रम...
१) प्रारूप आरक्षणास मान्यता घेणे व राज्य निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर करणे.
कालावधी : ३० ऑक्टोबर २०२५ ते ३ नोव्हेंबर २०२५
२) आरक्षण सोडतीची जाहीर सूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे : ६ नोव्हेंबर २०२५
३) आरक्षणाची सोडत काढणे : ११ नोव्हेंबर २०२५ सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करणे.
४) प्रारूप आरक्षण, हरकती व सूचना मागविणे (जाहीर सूचना) : १४ नोव्हेंबर २०२५
५) हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२५
६) प्राप्त हरकती / सूचनांवर आयुक्तांचा निर्णय : २१ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर
७) अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे : २८ नोव्हेंबर २०२५
प्रवर्गनिहाय जागा
एकूण जागा : २२७
अनुसूचित जाती : १५
अनुसूचित जमाती : २
इतर मागासवर्गीय : ६१
महिला : ११४ (५० टक्के आरक्षण)