EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 06:04 IST2025-08-01T06:03:51+5:302025-08-01T06:04:25+5:30
या प्रक्रियेत ८ उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी पाहिली.

EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर करण्यात आलेल्या ईव्हीएम तपासणी व पडताळणी प्रक्रियेत सर्व यंत्रे योग्य स्थितीत असल्याचे तपासणीअंती स्पष्ट केले आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी १० उमेदवारांच्या विनंतीनुसार १० विधानसभा मतदारसंघांमधील मतदार युनिट (बीयू), नियंत्रण यंत्र (सीयू) व व्हीव्हीपॅट (व्हीव्हीपॅट) यांची तपासणी केली. सर्व यंत्रांनी निदान चाचण्या उत्तीर्ण केल्या व व्हीव्हीपॅट स्लीप आणि ईव्हीएम निकालात कोणताही फरक आढळला नाही. या प्रक्रियेत ८ उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी पाहिली. एकूण ४८ मतदार युनिट, ३१ नियंत्रण यंत्रे आणि ३१ व्हीव्हीपॅट यांची तपासणी झाली. दोन उमेदवारांनी उपस्थित राहणे टाळले.
काही मतदारसंघांमध्ये (कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, खडकवासला, माजलगाव) मायक्रो कंट्रोलर व मेमरी पडताळणीसाठी निदान चाचणी घेण्यात आली तर पनवेल, अलीबाग, आर्णी, येवला, चंदगड, कोल्हापूर उत्तर आणि उर्वरित माजलगाव येथील यंत्रांवर निदान चाचणीबरोबरच मॉक पोल घेण्यात आला. सर्व चाचण्यांमध्ये यंत्रे योग्य कार्यरत असल्याचे प्रमाणित झाले. ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येत नाही. त्यामुळे निकालांबाबत शंका घेण्याचे कारण नाही, असे आयोगाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.