Join us  

मुंबईतील बिल्डर्सची सुपारी घेऊन ठाकरेंचा मोर्चा; राहुल शेवाळेंचा घणाघाती आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 4:43 PM

उद्धव ठाकरे यांचा आजचा मोर्चा संशयास्पद आहे, असं म्हणत राहुल शेवाळे यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई :धारावीचा पुनर्विकास होत असताना सरकारकडून केवळ अदानी समुहाच्या फायद्याचा विचार केला जात असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आज मुंबईत मोर्च्याचं आयोजन केलं आहे. धारावीतील टी जंक्शन येथून सुरू झालेला हा मोर्चा बीकेसीतील अदानी समुहाच्या कार्यालयावर धडकला असून या मोर्चात राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इतर मोठ्या नेत्यांनी सहभाग घेतला. या मोर्चाला संबोधित करत उद्धव ठाकरे हे आपली भूमिका मांडणार आहेत. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत.

ठाकरे गटाच्या आजच्या मोर्च्यावर हल्लाबोल करताना राहुल शेवाळेंनी म्हटलं आहे की, "मुंबईतल्या बांधकाम व्यवसायिकांची सुपारी घेऊन उद्धव ठाकरेंचा आजचा धारावीतला मोर्चा आहे. स्वतःच्या आर्थिक हितासाठी उद्धव ठाकरेंचा हा मोर्चा असून टीडीआरबद्दल उद्धव ठाकरेंनी केलेले आरोप खोटे आहेत. ते स्वतः अडीच वर्ष मुख्यमंत्री होते, तेव्हा धारावीबद्दल काही का केलं नाही?" असा खोचक सवाल शेवाळे यांनी विचारला आहे.

"मुंबई विमानतळावरून उद्धव ठाकरे जाणार नाहीत का?"  राहुल गांधी आणि इंडिया आघाडी यांच्यासमोर स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा हा मोर्चा असल्याची टीका राहुल शेवाळे यांनी केली आहे. तसंच "मुंबई विमानतळ अदानी चालवतात, मातोश्रीमध्ये वीजही आदानी यांची आहे. मग ही वीज वापरणार नाही का? मुंबई विमानतळावरून उद्धव ठाकरे जाणार नाहीत का?" अशा शब्दांत राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

दरम्यान, "धारावीला स्पेशल प्रोजेक्ट म्हणून जाहीर केलं आहे आणि ३०० स्क्वेअर फूट जागा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र पुनर्विकास करत असताना धारावीकरांना ४०० ते ५०० स्क्वेअर फूट एवढी जागा मिळायला हवी. धारावीमध्ये धारावीकरांना घर मिळालीच पाहिजेत, पण सोबतच गिरणी कामगार,  पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांनाही तिथं घरं देण्यात यावीत. टीडीआरबाबतही गोंधळ आहे. इतर विकासकांनाही टीडीआर घ्यायचा असेल तर ४० टक्क्यांची अट टाकत तो टीडीआर अदानींकडूनच विकत घ्यायला लागेल. मात्र यासाठी एक वेगळी कंपनी स्थापन करायला हवी. जसा बीडीडी चाळींचा विकास म्हाडाकडून केला जातो, तसा धारावीचा विकास सरकारने करावा. टीडीआर सरकारकडून विकत घेतला गेला पाहिजे," अशी भूमिका घेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं हा मोर्चा काढला आहे. 

टॅग्स :राहुल शेवाळेउद्धव ठाकरेधारावीअदानी