Join us  

Eknath Shinde: 'एकनाथ शिंदे गाडीत 1 तास ढसढसा रडले', बंडखोर आमदाराने सांगितली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2022 5:28 PM

मराठवाड्यातील बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना मुंबई ते गुजरात, गुवाहटी, गोवा आणि मुंबई असा प्रवास उलगडला.

मुंबई - राज्यात अनपेक्षितपणे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या 51 आमदारांच्या गटासह भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे, राज्यात पुन्हा युतीचं सरकार स्थापन झालं आहे. बंडखोर आमदारांनी आता त्यांच्या मतदारसंघात घरवापसी केली असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, आपली भूमिका मांडताना आम्ही आजही शिवसेनेतच असल्याच म्हटलं. तसेच, आम्ही बंडखोर नसून आमचा हा उठाव आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदेंना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीची माहिती दिली. 

मराठवाड्यातील बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना मुंबई ते गुजरात, गुवाहटी, गोवा आणि मुंबई असा प्रवास उलगडला. यावेळी, घडलेल्या अनेक प्रसंगांची माहिती दिली. तर, गुजरातला जाताना एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात पाणी होतं, तिथंही त्यांना रडू कोसळल्याची आठवण गायकवाड यांनी सांगितली.

''वयाची ४० वर्षे पक्षासाठी देणारी व्यक्ती ढसाढसा रडत असेल तर सर्वसामान्य आमदारांचं काय? असा प्रश्न आम्हाला सतावत होता. कारण, एकनात शिंदे गाडीत जवळपास 1 तासभर रडत होते, तिथे गेल्यानंतरही त्यांच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हतं, हा सगळा कठोर निर्णय घेताना त्यांना खूप वेदना होत होत्या. पण माघार घेणार नाही असं त्यांनी ठरवलं होतं,'' असंही संजय गायकवाड यांनी सांगितलं आहे. आमचा मुंबई ते सूरत प्रवास हा आश्चर्यकारक आणि धक्कादायक होता. आम्ही कुठे चालला आहोत याबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं. एकनाथ शिंदे आम्हाला बाहेर भेटतील असा निरोप होता. पण, थेट सूरतला गेल्यावर एकनाथ शिंदे आम्हाला भेटले. गुजरातमध्ये पोहोचल्यावर अचानकपणे ३०-३५ आमदार तिथे होते. अंगावरच्या कपड्यांमध्येच आम्ही गेलो होतो, अशी माहितीही गायकवाड यांनी दिली आहे.

आघाडी तोडा हीच आमदारांची मागणी

सूरतनंतर आम्ही सगळे गुवाहाटीला गेलो. नंतर तिथे इतर आमदार आले. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला, शिवसेना वाचवायची आहे, शिवसेना पुढे न्यायची आहे अशी चर्चा इथे झाली. आपण काहीही करा, पण आघाडी तोडा, आम्ही परत येण्यास तयार आहोत अस संदेश आम्ही मातोश्रीला देत होतो. मिलिंद नार्वेकर आले असता त्यांनाही हेच सांगण्यात आलं, असंही संजय गायकवाड यांनी सांगितलं. 

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबईशिवसेनाभाजपागौहती