Join us  

Eknath Shinde: बुद्धासारखी करुणा असलेला माणूस, एकनाथ शिंदेंवर शहाजी बापूंची स्तुतीसुमने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 8:58 PM

एकनाथ शिंदे हेच माझे नेते, काळजात बुद्धासारखी करुणा, दु:खाचा महासागर ओलांडून आल्यामुळे इतकी करुणा आणि दयाळू अंतकरण त्या माणसाकडे आहे

मुंबई - काय ती झाडी, काय ते डोंगार, काय ते हाटील, एकदम ओकेच, या डायलॉगने राज्यात फेमस झालेले सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी माध्यमांना मुलाखत देताना बंडाची ठिणगी पेटण्यापासून ते गुवाहाटी, गोवा आणि गव्हर्मेंट असा प्रवास दिलखुलासपणे उलघडला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदारांना बंडखोरी का केली आणि निधीमध्ये कशाप्रकारे दुजाभाव केला जायचा, याबाबत त्यांनी माहिती दिली. यावेळी, मातोश्रीवर होत असलेल्या दुर्लक्षपणाकडेही त्यांनी लक्ष वेधले. तर, आता आमचे नेते एकनाथ शिंदे हेच असल्याचंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.  

एकनाथ शिंदे हेच माझे नेते, काळजात बुद्धासारखी करुणा, दु:खाचा महासागर ओलांडून आल्यामुळे इतकी करुणा आणि दयाळू अंतकरण त्या माणसाकडे आहे. राग शून्य आणि सगळ्यांना शांततेनं समजावून सांगणारं नेतृत्त्व. एकनाथ शिंदे हे खरोखर क्षमता असलेलं नेतृत्व आहेत, अशा शब्दात शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमने उधळली आहेत. तसेच, उद्धव ठाकरे हे मोठे नेते असून त्यांच्याजवळील चौकडीबद्दल त्यांनी राग व्यक्त केला. 

ती चौकडी कोण, बापूंनी सांगितली नावं

ती चौकडी कोण असा प्रश्न विचारला असता, पहिलं नाव संजय राऊत यांचं घेतलं. त्यानंतर, सुभाष देसाई, विनायक राऊत, संजय नार्वेकर आणि अरविंद सावंत अशी 5 नावे त्यांनी घेतली. ही पाच मंडळी त्यांच्याच कोंडाळ्यात उद्धव ठाकरेंना घेऊन यायची आणि त्यांच्याच कोंडाळ्यात गाडीत घेऊन जायची. म्हणजे आम्ही बाजूला, पण कोण आलाय... शहाजी आलाय... ये काय तुझं काम आहे, सांगोल्यात काय म्हणतोय... असं विचारायला हवं, असे म्हणत आपली कैफितय माध्यमांसमोर मांडली. 

'50 आमदारांना ते आवडलं नाही'

एका वृत्त वाहिनीशी बोलताना शहाजी बाजू पाटील म्हणाले की, 'आमचे हे बंड काल-परवा ठरलेले नाही. याची सुरुवात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हाच झाली. मविका सरकार कुणालाच आवडले नव्हते. पण आम्ही सांगणार कोणाला, आमचे आमदार म्हणून शपथविधी झाले, नंतर घराकडे गेलो. नंतर अचानक फोन आला आणि मुंबईला बोलावलं. तिथे या हॉटेलमधून त्या हॉटेलमध्ये फिरवलं. उद्धव ठाकरे रात्री यायचे, काही मिनीटे बोलायचे आणि निघून जायचे. आम्हाला तेव्हा काहीच कळतं नव्हतं की, नेमकं चाललंय काय. ज्यांच्या विरोधात आपण लढलो, तिच माणसं सत्तेत सोबत असणार. आता काम कसे होणार, याचाच विचार मनात यायचा.' 

'निधीत दुजाभाव झाला'

'आमच्या 55 पैकी 50 आमदारांना ही आघाडी आवडली नव्हती. राष्ट्रवादी-काँग्रेसवाले आमची कामे करणार नाहीत, अशी अनेक आमदारांना भीती होती. माझे वाद निधीमुळे नाहीत, मला अनेक मंत्र्यांनी निधी दिला. मी आतापर्यंत 70-80 कोटींची कामे केली. पण, बारामतीला 1500 कोटींचा निधी मिळाला. 750 कोटी निधी रोहित पवारांना मिळाला. इतर नेत्यांनाही भरगोस निधी मिळाला. पण, आमच्याबाबत दुजाभाव झाला,' असे शहाजी पाटील म्हणाले. 

'आमच्यावर घाण आरोप केले'

'आम्ही उद्धव ठाकरेंना अनेकदा मनातलं बोलून दाखवलं होतं. वर्षावर बैठक झाली होती, त्यात आम्ही सगळी आकडेवारी मांडली. तिथे सगळ्या खात्यांचे सचिव होते, आम्ही त्यांना आधी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांचे आकडे वाचायला लावले. बंडखोरी केल्यामुळे आमच्यावर अनेक खालच्या पातळीवरचे आरोप झाले. इतकी खालची पातळी, इतकी घाणेरडी भाषा मी कधीच ऐकली नाही. चार महिला आमदार आमच्यासोबत होत्या, त्यांच्यावर वैश्या म्हणून टीका झाली. एका बाजुला परत या म्हणतात आणि दुसऱ्या बाजुला यांची प्रेत आणतो म्हणता,' असंही ते म्हणाले. 

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबईशिवसेनासांगोलागौहती