मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आंदोलनासाठी एक-एक दिवसाची मुदतवाढ देण्याऐवजी मराठा समाजाला थेट आरक्षण देऊन टाकावे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. मराठा समाजाला त्रास देऊन, त्यांच्या अन्न-पाण्याची सोय बंद करून मुंबईतून हाकलण्याचा सरकारचा डाव आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
जरांगे म्हणाले, "सरकारने मला काल परवानगी दिली, आज पुन्हा एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. असले 'भंगार खेळ' खेळण्यापेक्षा सरकारने थेट मराठा समाजाला आरक्षण देऊन खरे राजकारण करावे. गोरगरिबांच्या मुलांना आरक्षण दिले, तर मराठा समाज आयुष्यभर सरकारला विसरणार नाही. मराठा समाजाचे मन जिंकण्याची हीच योग्य वेळ आहे."
सरकार इंग्रजांपेक्षाही क्रूरआंदोलनादरम्यान आंदोलकांना होणाऱ्या त्रासावरही जरांगे यांनी बोट ठेवले. "मराठा समाजाच्या मुलांना लघवी करण्याचीही सोय नाही. वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थांची दुकाने बंद करण्यात आली आहेत, पाण्याचीही सोय नाही. मराठ्यांनी कंटाळून मुंबई सोडून जावे, असा यामागे डाव आहे," असे ते म्हणाले. यावर बोलताना त्यांनी सरकारला "तुम्ही इंग्रजांपेक्षाही क्रूर झाला आहात" अशा शब्दांत फटकारले.
जरांगे यांनी सरकारला थेट इशारा दिला. "मराठा समाजाची मुले माज घेऊन आलेली नाहीत, तर वेदना घेऊन आली आहेत. मी उपोषण करून मेलो तरी चालेल, पण या मुलांसाठी दुकाने बंद ठेवू नका. अन्यथा, तुमची आमच्याकडे सभा झाली तर आम्हीही पाणी बंद करू, दुकाने बंद करू," असा इशारा जरांगे यांनी दिला.
आता लढाई आरपारची!'ही लढाई आता आरपारची आहे, आम्ही मागे हटणार नाही. एकतर सरकारला आरक्षण द्यावं लागेल किंवा उपोषण करुन मी तरी मरेन, पण आता मागे हटणार नाही. आता फक्त आरक्षण नाही, तर त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी आंदोलन मागे घेणार नाही', असं मनोज जरांगे-पाटील म्हणाले.