मुंबईत कोरोना बाधितांमध्ये ८९ टक्के ओमायक्रॉनचे रुग्ण, आठव्या जिनोम सिक्वेंसिंगचा निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 21:17 IST2022-01-24T21:17:00+5:302022-01-24T21:17:19+5:30
Coronavirus Omicron : कोविड विषाणूचे जिनोम सिक्वेंसिंग ऑगस्ट २०२१ पासून नियमितपणे केले जात आहे.

मुंबईत कोरोना बाधितांमध्ये ८९ टक्के ओमायक्रॉनचे रुग्ण, आठव्या जिनोम सिक्वेंसिंगचा निष्कर्ष
मुंबई - कोविड विषाणूचे जिनोम सिक्वेंसिंग ऑगस्ट २०२१ पासून नियमितपणे केले जात आहे. कस्तुरबा रुग्णलयात करण्यात येणाऱ्या या चाचणीच्या आठव्या फेरीत ३७३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २८० नमुने मुंबईतील तर उर्वरित नमुने मुंबईबाहेरील होते. यामध्ये २८० नमुन्यांपैकी ८९ टक्के (२४८ नमुने) हे ‘ओमायक्रॉन’ बाधित रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. तर आठ टक्के (२१ नमुने) हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ तर उर्वरित तीन टक्के (११ नमुने) हे इतर उपप्रकाराचे असल्याचे आढळून आले आहे. त्यातही ११ नमुन्यांपैकी दोन नमुने ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे असल्याचे समोर आले आहे.
आठव्या फेरीदरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष महापालिकेने सोमवारी जाहीर केले. कोविड विषाणुंचे जिनोम सिक्वेंसिंग केल्यामुळे एकाच विषाणुच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील फरक ओळखता येतो. तसेच ज्या रुग्णांना कोविड बाधा झाली आहे, त्यांच्यावर अधिक परिणामकारक उपचार करणेही शक्य होते. ० ते १८ वयोगटातील १३ मुलं बाधित होतो. मात्र या रुग्णांना कोविड बाधा झाल्याची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत.
कोविड बाधित
वयोगट रुग्ण टक्केवारी
२१ ते ४० ९६ ३४
४१ ते ६० ७९ २८
६१ ते ८० ६९ २५
० ते २० २२ ०८
८१ ते १०० १४ ०५
२८० पैकी सात रुग्णांनी लसीचा पहिला डोस घेतला होता. यापैकी सहा रुग्णांना रुग्णालयात तर दोन रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या १७४ रुग्णांपैकी ८९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी दोन रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली. तर १५ रुग्णांना अतिदक्षात विभागात दाखल करावे लागले. एकूण रुग्णांपैकी ९९ रुग्णांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीचा एकही डोस घेतकेला नव्हता. यापैकी ७६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर १२ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली आणि पाच रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले.