Join us

लॉकडाउनचे पालन करत ईद साजरी; मुंबईतील बांधवांनी राखले भान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 01:54 IST

आनंद साजरा, पण नियम पाळून

मुंबई : यंदा कोरोनाचे संकट असल्याने राज्यभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. या लॉकडाउनमध्ये मुस्लीम बांधवांनी सोमवारी घरातच ईद साध्या पद्धतीने साजरी केली. या बांधवांनी घरातच आपल्या कुटुंबासमवेत ईद-उल-फित्रची नमाज अदा करून सर्वत्र शांती, कोरोनामुक्तीसाठी दुआ केली.

कोरोनामुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सर्वांना ईदगाह मैदाने, मशिदीमध्ये न जात घरातच नमाज अदा करावी लागली. बहुतांश मुस्लीम बांधवांनी कोरोनामुळे लॉकडाउनमध्ये साध्या पद्धतीने घरच्या घरी ईद साजरी केली. यंदा सोशल डिस्टन्सिंंगचे नियम पाळत बहुतांश बांधवांनी मित्र परिवार, आप्तस्वकीयांची भेट न घेता सोशल मीडियावरूनच शुभेच्छा देणे पसंत केले. घरातच ईद साजरी करून शीरखुर्माचा आनंद घेतला.

दरवर्षी शहरातील बाजारपेठेत तसेच रस्त्यांवर रमजानची रौनक असते. यंदा मात्र रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. कोरोनाचे संकट गंभीर असल्याने रमजान महिन्यात सर्वांचे व्यवसाय बंद राहिले. लॉकडाउनमुळे बाजारपेठा बंद असल्याने नवीन कपडे आणि शीरखुर्माचे साहित्यसुद्धा बहुतांश जणांनी खरेदीच केले नाही. महिनाभर घरातच रोजे ठेवून रमजान महिना अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला गेला.

सोशल मीडियावरून शुभेच्छा

मुस्लीम बांधवांनी यंदा कोरोनाच्या संकटामुळे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत ईदचा सण साजरा केला. यावेळी त्यांनी एकमेकांना व्हॉट्सअ‍ॅपवर तसेच फोन करून शुभेच्छा देणे पसंत केले. पहिल्यांदाच रमजान ईदचा सण घरोघरी उत्साहात साजरा करण्यात आला.

यंदा वस्तू खरेदीसाठी गर्दी नाही 

दरवर्षी ईद सणानिमित्त एक ते दोन दिवस आधीपासून बाजारात विविध वस्तू खरेदीसाठी होणारी गर्दी या वर्षी मात्र पाहावयास मिळाली नाही. यामुळे रस्त्यावर सर्वच ठिकाणी शुकशुकाट होता. ईदसाठी नवीन कपडे, खरेदी करण्याची परंपरा आहे, मात्र यावर्षी प्रथमच ईदला कपडे खरेदी करण्यात आले नाहीत.  च्सोशल डिस्टन्सिंंगचे नियम पाळत बहुतांश बांधवांनी मित्र परिवार, आप्तस्वकीयांची भेट न घेता सोशल मीडियावरूनच शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसईद ए मिलाद