वातावरणातील बदलाचा भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम, भाजीपाल्याचे दर वाढले

By नामदेव मोरे | Updated: February 28, 2024 19:48 IST2024-02-28T19:47:26+5:302024-02-28T19:48:20+5:30

मुंबई बाजार समितीमध्ये फ्लॉवर, वाटाणा, दुधी भोपळ्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे.

Effect of climate change on vegetable production, prices of vegetables increased | वातावरणातील बदलाचा भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम, भाजीपाल्याचे दर वाढले

वातावरणातील बदलाचा भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम, भाजीपाल्याचे दर वाढले

नवी मुंबई : वातावरणातील बदलामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. आवकमध्ये चढ उतार होत असल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये फ्लॉवर, वाटाणा, दुधी भोपळ्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे.

             मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी ६७७ वाहनांमधून ३ हजार टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये ४ लाख ७२ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. मागील काही दिवसांमध्ये आवकमध्ये चढ उतार होत आहे. राज्यात दिवसा प्रचंड उन्ह व रात्री थंडी असे वातावरण आहे. उन्हामुळे भाजीपाला पिकावर परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्यामुळेही उत्पादन कमी होत आहे. या सर्वांचा मुंबईतील आवकवर परिणाम होत असून बाजारभाव वाढू लागले आहेत. एक आठवड्यात दुधी भोपळ्याचे दर दुप्पट वाढले आहेत. दर प्रतीकिलो १२ ते १६ वरून २४ ते ३० रुपयांवर गेले आहेत. फ्लॉवर १० ते १५ वरून १४ ते १८ झाले आहेत. गवार ४० ते ५० वरुन ५० ते ७०, कारली २० ते ३० वरुन ३० ते ४०, वाटाणा ३० ते ४० वरुन ४६ ते ५६ रुपये किलो दराने विकला जात आहे.

किरकोळ मार्केटमध्येही तेजी
किरकोळ मार्केटमध्येही भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे बाजारभावही वाढत आहे. किरकेाळ मंडईत दुधी ६० रुपये किलो, फरसबी ७० ते ८०, फ्लॉवर ६० ते ८०, गाजर ४० ते ६०, कारली ५० ते ६०, ढोबळी मिर्ची ८० ते १००, शेवगा शेंग ८० ते १००,वाटाणा ६० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे.

घेवडा कैरीचे दर नियंत्रणात
बहुतांश भाज्यांचे दर वाढलेले असताना घेवड्याचे दर या आठवड्यात कमी झाले आहेत. दर प्रतिकिलो ३० ते ४० रुपयांवरून २६ ते ३२ रुपये झाले आहेत. कैरी ८० ते ९० रुपयांवरून ६० ते ७० रुपये किलोवर आली आहे.

एक आठवड्यातील भाजीपाल्याच्या दरातील फरक
वस्तू - २१ फेब्रुवारी - २८ फेब्रुवारी
दुधी भोपळा - १२ ते १६ - २४ ते ३०
फरसबी - २४ ते ३० - २६ ते ३०
फ्लॉवर - १० ते १५ - १४ ते १८
गाजर - १० ते १५ - १२ ते १६
गवार - ४० ते ५० - ५० ते ७०
काकडी १० ते १८ - १२ ते २०
कारली - २० ते ३० - ३० ते ४०
ढोबळी मिर्ची - ३५ ते ४५ - ४० ते ५०
शेवगा शेंग - ४० ते ५५ - ४० ते ६०
दोडका - २६ ते ३६ - ३० ते ४०
वाटाणा - ३० ते ४० - ४६ ते ५६
 

Web Title: Effect of climate change on vegetable production, prices of vegetables increased