बीबीए, बीएमएस सीईटीकडे पाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 09:50 IST2025-01-20T09:46:50+5:302025-01-20T09:50:52+5:30
Education News: सीईटी सेलने सुरू केलेल्या बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेच्या नोंदणीला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या पंधरा दिवसांत केवळ ८५०० विद्यार्थ्यांनीच प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.

बीबीए, बीएमएस सीईटीकडे पाठ
मुंबई - सीईटी सेलने सुरू केलेल्या बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेच्या नोंदणीला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या पंधरा दिवसांत केवळ ८५०० विद्यार्थ्यांनीच प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे बारावीनंतर आगामी शैक्षणिक वर्षात या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी करावी, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.
सीईटी सेलने गेल्या वर्षी पहिल्यांदाच बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमांची सीईटी घेतली होती. पहिल्यांदाच या अभ्यासक्रमांसाठी सीईटी होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना त्याबाबत माहिती नव्हती. त्यातून सीईटी सेलला दाेन वेळा परीक्षा घ्यावी लागली होती. त्यातून प्रवेश प्रक्रिया चांगलीच लांबली होती, तसेच कॉलेजेसही उशिरा सुरू झाले होते.
गेल्या वर्षी दोन्ही वेळी मिळून ८६ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती. कॅप फेरी विलंबाने सुरू झाल्याने ४६ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज भरले होते. प्रवेशासाठी १ लाख ८ हजार जागा उपलब्ध असताना केवळ ३८ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते.
सध्या ८,५०० विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. त्यातील ५,५८३ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे. यंदा प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करून कॉलेज वेळेवर सुरू करण्याचा सीईटी सेलचा प्रयत्न आहे. त्यामुळे सीईटी नोंदणीला मुदतवाढ दिली जाणार नाही. विद्यार्थ्यांनी नुकसान होऊ नये म्हणून वेळेवर नोंदणी करावी, अशी सूचना अधिकाऱ्यांनी केली.
गेल्या वर्षी पहिल्यांदाच या अभ्यासक्रमाची सीईटी होत असल्याने विद्यार्थी आणि पालकांना त्याबाबत माहिती नव्हती. त्यातून दोन वेळा सीईटी परीक्षा घ्यावी लागली. त्यातून कॉलेज सुरू होण्यास विलंब झाला. यंदा प्रवेश प्रक्रिया वेळेत होऊन कॉलेज सुरू होण्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सीईटी नोंदणी केली आहे. सीईटी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी वेळेत अर्ज भरावेत.
- दिलीप सरदेसाई,
आयुक्त, सीईटी सेल.