Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिका उपायुक्त हन्साळे यांना ईडीचे समन्स; सोमवारी उपस्थित राहण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 09:09 IST

कोरोनाकाळात गरिबांना तसेच स्थलांतरितांना खिचडी वाटपाचे कंत्राट महापालिकेने खासगी कंपन्यांना दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कोरोनाकाळात स्थलांतरितांना देण्यात आलेल्या खिचडी वाटपात घोटाळा झाल्याच्या आरोपाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबई महापालिकेच्या उपायुक्त संगीता हन्साळे यांना २६ ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे समन्स जारी करण्यात आले होते. मात्र, कार्यालयीन कामामध्ये व्यस्त असल्याने त्यांना सोमवारी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

कोरोनाकाळात गरिबांना तसेच स्थलांतरितांना खिचडी वाटपाचे कंत्राट महापालिकेने खासगी कंपन्यांना दिले होते. मात्र, या कंपन्यांनी नेत्यांशी संगनमत करून खिचडीची वाढीव दराची बिले पालिकेला दिल्याचा आरोप आहे.

याच अनुषंगाने १८ ऑक्टोबर रोजी संगीता हन्साळे यांच्या निवासस्थानासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण तसेच खिचडीचे कंत्राटदार अशा एकूण आठ जणांवर छापेमारी करण्यात आली होती. कोरोनाकाळात महापालिकेत झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी यापूर्वी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे.

 

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालयमुंबई महानगरपालिका