‘ईडी’चे टोरेस घोटाळाप्रकरणी छापे; जप्त केले २१ कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 10:03 IST2025-01-25T10:02:55+5:302025-01-25T10:03:46+5:30
Mumbai News: सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी ईडीने मुंबई आणि जयपूर या दोन ठिकाणी एकूण १३ ठिकाणी छापेमारी केली.

‘ईडी’चे टोरेस घोटाळाप्रकरणी छापे; जप्त केले २१ कोटी रुपये
मुंबई - सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी ईडीने मुंबई आणि जयपूर या दोन ठिकाणी एकूण १३ ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या विविध बँक खात्यांतील एकूण २१ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
सोने, चांदी, हिरे यांच्यामध्ये गुंतवणूक केल्यास प्रत्येक आठवड्याला २ ते ९ टक्के दराने परतावा देण्याचे आमिष कंपनीने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना दाखवले होते. तसेच जे गुंतवणूकदार नव्या गुंतवणूकदारांना घेऊन येतील त्यांना बोनस देण्याचे आमिष कंपनीने दाखवले. अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने कार्यशाळांचे आयोजन केले होते. सोशल मीडियावरून जाहिरातबाजी केली तसेच लकी ड्रॉ योजनेंतर्गत काही लोकांना कार, महागडे मोबाइल भेट देत त्यांना भुलविल्याचे ईडीच्या तपासात आढळून आले आहे. याप्रकरणी सर्वप्रथम शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ठाणे, नवी मुंबईतही कंपनीविरोधात गुन्हे दाखल झाले होते. कंपनीने मनी लाँड्रिंग केल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने काही दिवसांपूर्वी या तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत.