मुंबई : परदेशी विनिमय चलन कायद्याचा (फेमा) भंग केल्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अहमदाबाद आणि मुंबई येथे छापेमारी करत दोन शेअर दलालांची चार आलिशान वाहने, १ कोटी ५१ लाख रुपयांची आलिशान घड्याळे आणि १५ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. याचसोबत त्यांनी केलेल्या कथित गैरव्यवहारांची कागदपत्रे, तब्बल ४० कंपन्यांची चेक बुकही जप्त करण्यात आले आहे.
महेंद्र शहा आणि मेघ शहा या अहमदाबाद स्थित दलालांनी केलेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणा (डीआयआर) आणि गुजरात दहशतवादी विरोधी पथकाने मार्च २०२५ मध्ये सर्वप्रथम छापेमारी केली होती. त्यावेळी या दोघांकडून ८८ किलो सोने जप्त करण्यात आले होते. यापैकी ५२ किलो सोने हे दुबई, ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंड येथून आल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी फेमा कायद्याचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने एप्रिल २०२५ मध्ये तपास सुरू केला. ईडीच्या तपासाच्या पहिल्या टप्प्यात ईडीने या दोन्ही आरोपी व त्यांच्या साथीदारांकडून २३ लाख रुपयांची रोख रक्कम व आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे जप्त केली होती. याच तपासाच्या अनुषंगाने मुंबई व अहमदाबाद येथे छापेमारी करत ही मालमत्ता जप्त केली आहे.