लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उत्तर प्रदेशात धर्मपरिवर्तन करत मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा केल्याप्रकरणी जल्लालुद्दीन ऊर्फ छांगुरबाबा याच्या विरोधात गेल्या आठवड्यात ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातील बलरामपूर आणि मुंबईत ईडीने छापेमारी केली आहे.
छांगुरबाबाच्या चौकशीत त्याने आतापर्यंत ४० बँक खात्यांतून १०० कोटी रुपये परदेशात पाठविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला आणखी पैसे मिळाल्याचा ईडीला संशय असून, ईडीने आयकर विभागाशी संपर्क साधत त्याचे गेल्या १० वर्षांचे आयकर विवरण, तसेच उपनिबंधक कार्यालयाकडे त्याच्या स्थावर मालमत्तेचे तपशील मागविले आहेत.
त्याचसोबत त्याची पत्नी, मुलगी आणि त्याच्या साथीदारांचेही आयकर विवरण आणि मालमत्तेचे तपशील मागवले आहेत. त्याच्या ४० बँक खात्यांसह त्याची पत्नी व मुलगी व साथीदार यांच्याकडील अन्य १०० खात्यांतून मनी लाँड्रिंग झाल्याचा ईडीला संशय आहे. त्याला प्रामुख्याने यूएई येथून हे पैसे मिळाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.
मुंबईसह पुण्यातही मालमत्ता असल्याचा संशयमुंबईसह पुण्यातदेखील जल्लालुद्दीन ऊर्फ छांगुरबाबा याची काही मालमत्ता असल्याची माहिती ईडीला मिळाली असून, या मालमत्तांची खरेदी त्याने कोणत्या पैशांतून केली आहे याचा तपास ईडी करत आहे.