Join us  

डीएचएफएलच्या आठ मालमत्तांवर ईडीचे छापे; डी गँगच्या पैशांचा शोध घेण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 4:21 AM

मृत गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या मुंबईतील मालमत्तेप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) करीत असलेल्या चौकशीतून नवनवीन गोष्टी बाहेर येत आहे.

मुंबई : मृत गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या मुंबईतील मालमत्तेप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) करीत असलेल्या चौकशीतून नवनवीन गोष्टी बाहेर येत आहेत. गृहनिर्माणासाठी अर्थसाहाय्य करणाऱ्या दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीने (डीएचएलएफ) त्याला दिलेल्या कर्जाची रक्कम दुबईत डी गँगकडे वर्ग करण्यात आल्याचे तपासात समोर आल्याने त्याबाबत पुरेसे पुरावे गोळा करण्यासाठी ईडीने या कंपनीची आठ कार्यालये व फ्लॅटवर छापे टाकले.

डीएचएलएफच्या प्रमुख वाधवा यांना चौकशीसाठी लवकरच बोलाविण्यात येणार आहे. शनिवारी केलेल्या कारवाईतून कंपनीच्या व्यवहारासंबंधी महत्त्वपूर्ण कागदपत्रे हाती लागल्याचा दावा ईडीच्या अधिकाऱ्यांनी केला. डीएचएफएलने सनब्लिंक रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड आणि आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना दिलेल्या कर्जासंबंधित कागदपत्रे, अन्य वित्तीय महामंडळाशी संबंधित इतर कागदपत्रांचा यात समावेश असल्याचे ईडीतील अधिकाºयांकडून सांगण्यात आले.

दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार इकबाल मेमन उर्फ इकबाल मिर्ची याची मालमत्ता विक्रीप्रकरणी अटक केलेल्या रणजित बिंद्रा व युसूफ हरूणकडे केलेल्या चौकशीतून ही माहिती पुढे येत आहे. या व्यवहाराप्रकरणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून शुक्रवारी तब्बल १२ तास चौकशी करण्यात आली. त्यांच्या वरळीतील सीजे हाउस या १५ मजली इमारतीच्या पुनर्वसनावेळी मिर्चीशी त्यांनी करार केल्याचा अधिकाºयांना संशय आहे. आता या प्रकरणात डीएचएफएल कंपनीचा सहभाग आता स्पष्ट झाला आहे. त्यांनी दिलेले २,१८६ कोटी दुबईत हवालामार्फत पाठविल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालयपोलिस