मुंबई : टॉप सिक्युरिटी ग्रुपवर दाखल मनी लाॅण्ड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते राज कपूर यांचा नातू व अभिनेता रणबीर कपूर याचा आत्येभाऊ अरमान जैन याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांच्याशी त्याचे व्हॉट्सॲप चॅटमध्ये संभाषण झाल्याने त्याच्याकडे चौकशी केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.अरमान हा दिवंगत अभिनेते राज कपूर यांची मुलगी रिमा यांचा मुलगा असून, अभिनेत्री करिष्मा व करिना कपूरचा आत्येभाऊ आहे. अभिनेते राजीव कपूर यांच्या निधनादिवशीच मंगळवारी ईडीने अरमानच्या घरी छापा टाकला होता. तपासणीनंतर त्याला व त्याच्या पत्नीला अंत्यदर्शनाला जाण्यास अधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती.अरमान याने ‘लेकर हम दिवाना दिल’ या चित्रपटातून पदार्पण केले आहे. प्रताप सरनाईक यांच्या कंपनीबद्दल आलेल्या एका तक्रारीनुसार गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये ईडीने मनी लाँड्रिगचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या ठाणे व मुंबईतील विविध निवासस्थाने आणि कार्यालयांवर छापे टाकले. सरनाईक पिता-पुत्राची कसून चौकशी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सबळ पुराव्याशिवाय आणि कोर्टाने पूर्वकल्पना दिल्याशिवाय अटकेची कारवाई न करण्याची सूचना दिली. त्यामुळे ईडीने त्या प्रकरणाचा अन्य बाजूंनीही तपास सुरू केला असूनए आतापर्यंत टॉप्स ग्रुपच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.असा आहे टॉप्स ग्रुप घोटाळा काही दिवसांपूर्वी टॉप्स सिक्युरिटी घोटाळा उघडकीस आला. एमएमआरडीएला पाचशे ट्रॅफिक वॉर्डन पुरवण्याचे कंत्राट टॉप्स सिक्युरिटीला मिळाले होते. टॉप्स सfक्युरिटी मात्र, ७५ टक्के ट्राफिक वॉर्डन पुरवत होती आणि बाकी वॉर्डन यांची नेमणूक न करताच पैसे लाटत होती. या गुन्ह्यात टॉप्स सिक्युरिटीचे मालक राहून नंदा आदी ११ जण आरोपी आहेत. यापैकी काहींना अटक झाली आहे.अरमान हा विहंग यांचा खास मित्र!अरमान हा विहंग यांचा खास मित्र असून, त्यांचे व्यावसायिक संबंध असल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. दोघांचे व्हाट्सॲप चॅटवरून अनेकवेळा संभाषण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पथकाने मंगळवारी अरमानच्या घरी छापा टाकून तपासणी केली होती. राजीव कपूर यांच्या अंत्यविधीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर तातडीने चौकशीला हजर राहण्याची सूचना करण्यात आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
मनी लाॅण्ड्रिंग: राज कपूरच्या नातवाला ईडीने बजावली नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 03:36 IST