मुंबई : खैर वृक्षाच्या तस्करीतून मिळणारा पैसा दहशतवादी कृत्यांसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी ईडीने आयकर विभागासह महाराष्ट्र एटीएसच्या सहकार्याने राज्यात ४० ठिकाणी छापेमारी केली. ही छापेमारी भिवंडीतील बोरीवली गाव, पुणे, मालेगाव तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील काही गावांत केली आहे. याचसोबत दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश येथेही छापेमारी करण्यात आली आहे.
‘इसिस’च्या माध्यमातून राज्यात दहशतवादी कारवाया करणाऱ्या साकिब नाचण आणि पुण्यातील प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. याच प्रकरणी मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यावर ईडीने याप्रकरणी ईसीआयआर दाखल करत गुरुवारी पहाटेपासून छापेमारी सुरू केली आहे.
बोरीवली गावाला छावणीचे स्वरूप
२८ जून रोजी कारागृहात मृत्यू झालेल्या कुख्यात दहशतवादी साकिब नाचणच्या दफनविधीनंतर एटीएसची ही पहिली मोठी कारवाई मानली जात आहे. याच साकीब नाचणमुळे बोरीवली गाव पुन्हा चर्चेत आले असून संपूर्ण गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. गावातील वीस ते पंचवीस घरांवर ईडी, आयकर विभाग व एटीएसने छापेमारी केली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी पंचायत समितीचे सदस्य मुशीर नाचन, सैफ नाचन, आदिल खोत, वसी नाचन, फिरोज कुवारी, राहील चिखलेकर, उस्मान मुल्ला, रेहान सुसे, फरहान सुसे, नदीम मुल्ला, अतिफ नाचण, नादींनाचर सज्जाद मुल्ला, शगफ नाचन, शगफ दिवकर, आकिब नाचण यांच्या घरांवर तसेच कार्यालयांवर छापे पडले. बदलापूर गावातील जिलानी या व्यक्तीच्या घरावरही गुरुवारी पहाटे छापा टाकण्यात आला.