ब्रँडेड पिझ्झा, बर्गर खाताय? सावधान! आधी हे वाचा... दर्जाहीन चीज, पनीर अन् तेलाचा सढळ हस्ते वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 10:28 AM2024-02-29T10:28:51+5:302024-02-29T10:29:06+5:30

मागणी आहे म्हणून ढिगाने हे खाद्यपदार्थ बनविणाऱ्या नामांकित ब्रँडच्या दुकानांमध्ये सर्रास दर्जाहीन चीज, पनीर आणि तेलाचा सढळहस्ते वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Eating branded pizzas, burgers? Beware! Read this first... Use of unrated cheese, paneer and oil liberally | ब्रँडेड पिझ्झा, बर्गर खाताय? सावधान! आधी हे वाचा... दर्जाहीन चीज, पनीर अन् तेलाचा सढळ हस्ते वापर

ब्रँडेड पिझ्झा, बर्गर खाताय? सावधान! आधी हे वाचा... दर्जाहीन चीज, पनीर अन् तेलाचा सढळ हस्ते वापर

- स्नेहा मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एरवी रस्त्याच्या कडेला असलेल्या वडापाव, पावभाजीच्या गाडीवरील खाद्यपदार्थांना आपल्या पोटात सहजपणे जागा देणाऱ्या मुंबईकरांनी ब्रँडेड खाद्यपदार्थांची चव चाखावी म्हणून पिझ्झा-बर्गरना पसंती दिली. वडापाव, पावभाजीच्या तुलनेत कैकपटींनी महाग असलेल्या या झटपट खाद्यपदार्थांनी मात्र खवय्यांची निराशा करण्याचा विडा उचलला आहे. मागणी आहे म्हणून ढिगाने हे खाद्यपदार्थ बनविणाऱ्या नामांकित ब्रँडच्या दुकानांमध्ये सर्रास दर्जाहीन चीज, पनीर आणि तेलाचा सढळहस्ते वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

पूर्व उपनगरांतील घाटकोपर, मुलुंड आणि पश्चिम उपनगरांतील कांदिवली, बोरिवली, अंधेरी, मालाड, वांद्रे, सांताक्रूझ आणि शहरातील भेंडीबाजार, ताडदेव, दादर, लोअर परळ येथील ब्रँडेड फास्ट फूड कंपन्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) रडारवर आल्या आहेत. त्याला निमित्त ठरले अहमदनगर येथील ‘मॅकडोनाल्ड’च्या दुकानात आढळलेले चीज ॲनालॉग प्रकरण. 

‘एफडीए’ने आपला मोर्चा मुंबईत आधी उल्लेख केलेल्या उपनगरांतील केएफसी, पिझ्झा हट, डॉमिनोज, सबवे, बार्बेक्यू नेशन, बर्गर किंग, केऑस कंट्रोल कॅफे अशा नामांकित ब्रँड्सच्या १७ दुकानांकडे वळवला असून, त्यातील दहा खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. 

प्राथमिक तपासात या सर्व खाद्यपदार्थांमध्ये दर्जाहीन तेल, चीज आणि पनीर यांचा वापर केल्याचे एफडीए अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. ब्रँडेड खाद्यपदार्थांकडे आकृष्ट होणाऱ्या लहानग्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे अतिशय गंभीर आहे.

 दर्जाच नाही... 
 पनीरमध्ये खनिज, कर्बोदके, कॅल्शिअम, जीवनसत्त्वे असे अनेक पोषक घटक असतात. 
 फास्ट फूड कंपन्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यात येणाऱ्या पनीरमध्ये यातले काहीच आढळले नाही. 
 निकृष्ट दर्जाचे पनीर असल्यास ते त्वरित कुस्करले जाते. ते दूध पावडर आणि स्किम्ड पावडरीपासून बनविले जाते. आरोग्यासाठी हे अत्यंत हानिकारक असते. 
 बनावट चीजसाठी डालडा सदृश्य वा अन्य चीजसदृश्य पदार्थांचा वापर करून अत्यंत दर्जाहीन पदार्थ ग्राहकांच्या माथी मारला जातो. 
 शुद्ध रिफाइंड तेलातही सर्रास पामतेलाची भेसळ केली जाते. तसेच खाद्यतेलाचा पुनर्वापरही होतो. त्यामुळे हृदयविकार बळावण्याचा धोका असतो. 

गेल्या काही रस्त्यांवरील उघडे पदार्थ खाणे टाळताना फास्टफूडचे सेवन वाढले आहे. यावेळी ब्रँडचा पर्याय असल्यास अशा ठिकाणी आपली फसवणूक होत नाही किंवा अशा ठिकाणी दर्जेदार खाद्यपदार्थच मिळतात, असा ग्राहकांचा भाबडा समज असतो. नुकत्याच घडलेल्या मॅकडोनाल्ड प्रकरणातून ग्राहकांचे डोळे उघडले आहेत. त्यामुळे आता भविष्यात आपल्या आहाराविषयी महागड्या ब्रँड्सना निवडण्याआधी योग्य व पोषक आहाराची निवड ग्राहकांनी करावी, तसेच कुठल्याही खाद्यपदार्थांचे सेवन करताना काही तक्रारी आढळल्यास वा संशयास्पद बाब वाटल्यास त्वरित ‘एफडीए’कडे तक्रार करावी. 
- शैलेश आढाव, सहआयुक्त, अन्न, एफडीए

Web Title: Eating branded pizzas, burgers? Beware! Read this first... Use of unrated cheese, paneer and oil liberally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.