Join us  

E-pass : नुसता गोंधळ झालाय, लॉकडाऊनच्या ई-पास नियमावलीवरुन चित्रा वाघ संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 3:34 PM

E-pass : सरकारने 22 मे रोजी जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नवीन नियमावलीनुसार जिल्ह्याबाहेर जाण्यास बंदी असणार आहे.

ठळक मुद्देहे काय आता नविन... काल परवापर्यंत नविन लॉकडाऊन नियमावलीत E-pass वगैरे नसणार म्हणून सांगण्यात आलं. आता, अचानक या माहितीने अजून लोकांचा गोंधळ वाढणार आहे.

मुंबई - राज्यातील कोरोना परिकस्थिती दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य सरकारने कडक लॉकडाऊन लागू केला आहे. या कडक निर्बंधात शासनाने काही बदल केले आहेत. गुरुवारी रात्री आठपासून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. परजिल्ह्यातून कोणी जिल्ह्यात आल्यास त्याच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येईल. आता, जिल्हाबाहेर प्रवास करण्यासाठी ई-पास गरजेचा असल्याचं महाराष्ट्र पोलीसच्या ट्विटर हँडलवरुन सांगण्यात आलंय. त्यामुळे, भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा यांनी संताप व्यक्त केलाय.   

सरकारने 22 मे रोजी जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नवीन नियमावलीनुसार जिल्ह्याबाहेर जाण्यास बंदी असणार आहे. अत्यावश्यक कारणांसाठीच प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय जिल्ह्याबाहेर जाऊ दिले जाणार नाही. खासगी बससेवेतून परजिल्ह्यातून कोणी जिल्ह्यात आले तर त्याच्या हातावर शिक्का मारत त्या व्यक्तीस १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येणार आहे. जिल्ह्याबाहेरील प्रवासासाठी ई-पास अनिवार्य आहे. सरकारच्या या सातत्याने बदल होणाऱ्या नियमावलीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावरुन, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारचा नुसता गोंधळ सुरू असल्याचं म्हटलंय.  

हे काय आता नविन... काल परवापर्यंत नविन लॉकडाऊन नियमावलीत E-pass वगैरे नसणार म्हणून सांगण्यात आलं. आता, अचानक या माहितीने अजून लोकांचा गोंधळ वाढणार आहे. एखादी व्यवस्थित हेल्पलाईन तरी सुरू करा, ज्याने लोकांना मदत होईल. राज्यात १७६० लोक वेगवेगळं बोलताहेत, ज्याने नुसता गोंधळ झालाय, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी ई-पास प्रणालीवरुन नाराजी दर्शवली आहे. 

महाराष्ट्र पोलीसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ई-पास संदर्भात माहिती देण्यात आली आहे. 'आपत्कालीन परिस्थितीत आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पासची सुविधा सुरू करण्यात येत आहे. आपण खालील लिंकवर अर्ज करू शकता: http://covid19.mhpolice.in अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन पास प्राप्त करू शकता. पासचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थिती केला जावा.'', असे या ट्विटमध्ये म्हटलंय. चित्रा वाघ यांनी हे ट्विटही शेअर केलं असून सगळा गोंधळ सुरू असल्याची टीका महाविकास आघाडी सरकारवर केलीय.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसपोलिसभाजपाचित्रा वाघ