शिवाजी पार्कवरील धूळ; मनसे, उद्धवसेना उतरली मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:56 IST2025-01-04T13:55:16+5:302025-01-04T13:56:42+5:30
तर उद्धवसेनेचे स्थानिक आमदार महेश सावंत यांनी मैदानाची पाहणी केली.

शिवाजी पार्कवरील धूळ; मनसे, उद्धवसेना उतरली मैदानात
मुंबई : दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात पसरलेल्या धुळीवर पालिका प्रशासनाने महिनाभरात उपाययोजना केली नाही, तर मैदानातील माती पालिकेच्या कार्यालयासमोर टाकू, असा इशारा मनसेने पालिका प्रशासनाला दिला आहे. तर उद्धवसेनेचे स्थानिक आमदार महेश सावंत यांनी मैदानाची पाहणी केली.
मनसेने पालिकेच्या जी/उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तांना जाब विचारण्यासाठी शुक्रवारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी शिवाजी पार्क मैदानातील माती मडक्यातून सहायक आयुक्तांना देण्यात आली. परिसरातील ज्येष्ठ नागरिक हितगुज करण्यासाठी फेरफटका मारण्यासाठी शिवाजी पार्क येथे येतात, लहान मुले बगीच्यात खेळण्यासाठी येतात सकाळपासूनच मैदानावरील धूळ उडत असल्याने इथे येणाऱ्या प्रत्येकाला या धुळीचा सामना करावा लागतो. येथे हिरवळ व्हावी यासाठी लाल माती टाकण्यात आली. मात्र हवेतून धूळ नागरिकांच्या नाकातोंडात जात आहे. इथली झाडे, इमारतींवर लाल मातीची धूळ माखली जात आहे. त्यामुळे महिन्याभरात उपाययोजना केली नाही तर मैदानातील माती पालिका कार्यालयासमोर टाकू, असा इशारा किल्लेदार यांनी दिला.
शिवाजी पार्क मैदान धूळमुक्त करण्यासाठी मैदानातील मातीचा अतिरिक्त थर काढून मैदान समतोल करण्यात येणार आहे. तसेच शिवाजी पार्क मैदानात असलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोरील शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भित्तीशिल्प असलेली भिंत आता दगडी स्वरूपात बसविण्यात येणार असून त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. मैदानात क्रिकेट खेळताना बॉल लागू नये यासाठी बसविण्यात आलेली तुटलेली संरक्षक जाळीही नव्याने लावण्यात येईल. शिवाजी पार्क मैदानाच्या भोवती असलेल्या कट्ट्यावर टाइल्सचे तुकडे लावण्यात येतील. जेणेकरून तिथे बसणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही.
- महेश सावंत, आमदार उबाठा
तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार येथे २५० ट्रक लाल माती टाकली. पण याच धुळीचा त्रास रहिवाशांना होत आहे. त्यावर आयआयटीच्या अहवालानंतर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आश्वासन सहायक आयुक्तांनी दिल्याचे आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे महिन्याभरात उपाययोजना न केल्यास मैदानातील माती पालिका कार्यालयासमोर आणून टाकू, असा इशारा किल्लेदार यांनी दिला.
- यशवंत किल्लेदार, मनसे नेता