"तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका पण मी तुम्हाला संधी देतोय"; मुनगंटीवारांचा CM फडणवीसांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 19:06 IST2025-07-10T18:59:54+5:302025-07-10T19:06:49+5:30
Jansurksha Bill: जनसुरक्षा विधेयकावरील चर्चेदरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्त्वाची मागणी केली.

"तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका पण मी तुम्हाला संधी देतोय"; मुनगंटीवारांचा CM फडणवीसांना टोला
Sudhir mungantiwar on CM Devendra Fadnavis: गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले जनसुरक्षा विधेयक गुरुवारी विधानसभेत मांडण्यात आलं. या विधेयकावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले. यावेळी विरोधकांनी काही आक्षेप नोंदवले. या विधेयकावर बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना सुनावलं. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक मागणीही केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त ठरलेले जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मांडले. विरोधकांच्या आक्षेपानंतर चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेला अहवाल ९ जुलै रोजी विधानसभेत पटलावर ठेवण्यात आला होता. विरोधकांच्या आक्षेपानंतर विधेयकात काही बदल करण्यात आल्यानंतर ते विधानसभेत मांडण्यात आलं. यावर विरोधकांनी काही शंका उपस्थित केला. यावरुनच सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधांकडे या विधेयकाला पाठिंबा देण्याची मागणी केली. यावेळी मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावताना मला संधी देऊ नका असं म्हटलं.
"मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे अभिनंदन करतो. कारण आम्ही नक्षलवाद अनुभवला आहे. त्यामुळे या सभागृहातून लोकांमध्ये एक प्रकारची भीती पसरवण्याचा प्रयत्न होऊ नये. हे विधेयक क्रमांक ३३ सामान्य माणसासाठी आले आहे. इथल्या सदस्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी एकदा गडचिरोलीमध्ये येऊन पहावं आणि त्या विधवा बहिणींना भेटावं. त्यांचा काय दोष आहे. या विधेयकाचे अभिनंदन केले असते तर मी समजू शकलो असतो. पण अभिनंदन केलं गेलं नाही. पक्षाचे वरिष्ठ नेते नाराज होतील या भीतीने अभिनंदन केले गेले नाही," असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
"तुम्ही कायद्याला घाबरत आहात का? तुमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का? नक्षलवाद्यांनी आता क्षेत्रे बदलली आहेत. आता विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये ते बसायला लागले आहेत. विचारधारा वेगळी असू शकते पण अशा विधेयकाच्या वेळेस सर्वांनी एकच झालं पाहिजे. अन्यथा शंका कुशंका केल्यावर काय संदेश जाईल. सभागृहाने हे विधेयक एकमताने पारित करून नक्षलवादी डाव्या कडव्या विचारसरणींना सांगायचं आम्ही सर्वजण भारत माता की जय म्हणणारे आहोत," असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
"चंद्रपूर, गडचिरोलीच्या लोकांनी अधिकाऱ्यांनी नक्षलवाद कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तुम्ही एक जीआर काढून टाकला आणि त्यांचा भत्ता बंद करून टाकला. मन मोठं करा. तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका पण मी तुम्हाला तो भत्ता सुरू करण्याची संधी देतोय," अशी मागणी सुधीर मुनगंटीवर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
दरम्यान,सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीवरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 'सुधीर भाऊ तुमचं हे स्टेटमेंट रेकॉर्डवरून कधीच काढलं जाणार नाही,' असं म्हटलं.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
"मला काहीच बनवू नका पण भत्ता द्या हे मी सुधीर मुनगंटीवार यांचे ऐकणार नाही. आमच्या मानसपटलावर सुधीर मुनगंटीवार यांची जी जागा आहे ती वर आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य जागा त्यांना मिळेल," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.