Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा संतापजनक प्रताप! अधिकाऱ्यांनीच तरुणाच्या खिशात ठेवले ड्रग्ज; असे फुटले बिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 17:28 IST

तपासादरम्यान मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीच्या खिशात ड्रग्ज ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Mumbai Police : मुंबईसह राज्यभरात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विरोधी कारवाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतही अनेक ड्रग्ज तस्करांना पोलिसांनी जेरबंद केल्याचे वृत्त अनेकदा समोर आलं आहे. मात्र अशातच मुंबई पोलिसांच्या धक्कादायक कारवाईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोलिसांनी एका व्यक्तीला पकडण्याच्या उद्देशाने त्याच्या खिशात ड्रग्ज ठेवले आणि नंतर त्याला अटक करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पीडित व्यक्तीसोबत ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तिथल्या सीसीटीव्ही ही घटना कैद झाली आहे. फुटेज दाखवल्यानंतर त्या व्यक्तीला सोडून देण्यात आलं आहे. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईतील खार पोलीस ठाण्यामध्ये तैनात असलेल्या चार अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीच्या खिशात ड्रग्ज ठेवले आणि नंतर त्याला अटक केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या या कृत्याची संपूर्ण कहाणी तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यामुळे त्या व्यक्तीचे निर्दोषत्व सिद्ध झाले आणि त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. या घटनेनंतर खार पोलीस ठाण्यातील चार अधिकाऱ्यांविरुद्ध तपास सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या पोलिसांविरुद्ध खार पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अधिकारी डॅनियल नावाच्या व्यक्तीच्या खिशात एक वस्तू ठेवताना दिसत आहे. त्यानंतर त्याला २० ग्रॅम मेफेड्रोन ठेवल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर त्या व्यक्तीला सोडून देण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार,  डॅनियल हा शाहबाज खानचा कर्मचारी आहे. खान हे कलिना या ठिकाणी जनावरांचे फार्म चालवण्याचे काम करतात. “मी गेल्या ४० वर्षांपासून या जमिनीची काळजी घेत आहे. आम्हाला अडकवण्यासाठी बिल्डर आणि स्थानिक राजकारणी यांच्या संगनमताने हा सगळा प्रकार घडला आहे. याच्या महिनाभरापूर्वी मला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र शुक्रवारी संध्याकाळी मी घरी असताना हा सर्व प्रकार घडला. माझ्यासोबत तिथे काम करणाऱ्या डॅनियलला यात गोवण्यात आले. सुदैवाने ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे," असे  शाहबाज खान यांनी सांगितले.

खान यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास खार पोलीस स्टेशनचे चार अधिकारी डॅनियलकडे आले होते. "जेव्हा मी सीसीटीव्ही फुटेज पाहिले, तेव्हा स्पष्टपणे दिसत होते की अधिकारी डॅनियलच्या खिशात काहीतरी टाकत आहे आणि नंतर ते बाहेर काढून त्याला ताब्यात घेत आहे. हे फुटेज व्हायरल झाल्यानंतर, त्याला रात्री नऊ वाजता त्याला सोडण्यात आले. खार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन माने यांनी सांगितले की माहितीच्या आधारे त्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला आणि त्याच्याकडे काहीही सापडले नाही, त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. मी त्यांना  डॅनियलच्या खिशात काहीतरी ठेवल्याबद्दल विचारले असता ते  शांत झाले आणि त्यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगितले," असेही खान यांनी म्हटलं.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीस