लोकमत न्यूक नेटवर्क, मुंबई : जोगेश्वरीच्या प्रसिद्ध जय जवान गोविंदा पथकाला यंदाच्या प्रो-गोविंदा २०२५ स्पर्धेत संधी नाकारल्याने वाद निर्माण झाला आहे. वरळी येथील ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला सलामी दिल्यामुळे आयोजकांनी राजकारण करून या स्पर्धेतून डावलल्याचा आरोप पथकाच्या व्यवस्थापकांनी केला. तर, आयोजकांनी या आरोपाचे खंडन करत वेळेत नोंदणी न केल्यामुळे पथकाला स्पर्धेबाहेर ठेवण्यात आल्याचे स्पष्ट केले.
वरळीमधील डोम येथे ७ ते ९ ऑगस्ट या कालावधीत प्रो-गोविंदाची स्पर्धा रंगणार आहे. शिंदेसेनेचे नेते व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांनी प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन केले आहे. यात सहभागी होण्यासाठी आयोजकांनी १० जून रोजी दुपारी १२:०० वाजेपर्यंतची वेळ अंतिम नोंदणीसाठी दिली होती. मात्र, आम्हाला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे जय जवान पथकावर आयोजकांकडून अन्याय करण्यात आला, असा आरोप पथकाचे व्यवस्थापक विजय निकम यांनी केला.
जय जवान गोविंदा पथकाने स्पर्धेत भाग घेण्यासाठी १२ वाजून ४ मिनिटांनी रजिस्ट्रेशन केले. नोंदणीची वेबसाइट स्लो असल्याने ४ मिनिटे उशीर झाला. परंतु, त्याच वेळेला नोंदणी केलेल्या अन्य दोन गोविंदा पथकांना आयोजकांनी संधी दिली, असा दावा निकम यांनी केला.
आरोप फेटाळले
आयोजकांनी जय जवान पथकाचे आरोप फेटाळून लावले आहेत. यंदाच्या स्पर्धेसाठी ३२ पथकांना संधी दिली आहे. मागील वर्षीचे उपविजेतेही यंदा स्पर्धेत नाहीत. जय जवानने वेळेत नोंदणी केली नाही. काही सेकंदांमुळे ते मागे राहिले, असे आयोजकांनी स्पष्ट केले.