Join us

अल्पवयीनांकडून ‘दम मारो दम’; कारवाया थंडावल्या : सिगारेट, हुक्का यंत्राची सर्रास विक्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 10:02 IST

अल्पवयीन मुलांना, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास ‘कोटपा’ कायद्याने प्रतिबंध आहे.

मुंबई : अल्पवयीन मुलांना, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास ‘कोटपा’ कायद्याने प्रतिबंध आहे. संबंधित विभागांकडून त्यावर नियमित कारवाई केली जात नसल्याने शहरात नाक्यानाक्यांवर सर्रास तंबाखू, सिगारेट, हुक्का यंत्राची विक्री सुरू आहे.

२४ नोव्हेंबर २०२० चा परिपत्रकानुसार कोटपा कायदा २००३ कलम ७ (२) ची अंमलबजावणी होण्यासाठी बिडी, सिगारेट उत्पादने पाकिटाशिवाय तसेच वैधानिक इशाऱ्याशिवाय विक्री करणे पूर्णतः बंदी आहे. तरी मुंबईत कुर्ला पश्चिम रेल्वे स्थानक, चेंबूर, माहीम, धारावी, वांद्रे, जोगेश्वरी परिसरात मोठ्या प्रमाणात खुली सिगारेट किंवा तंबाखू विकला जातो. तसेच शहरात प्रत्येक नाक्यावर, रेल्वे स्थानकाबाहेर, चौकात पानपट्टीवर खुलेआम अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकले जात आहेत.  मुंबईत प्रामुख्याने पोलिस, पालिका, अन्न प्रशासन, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कोटपा कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, राज्याची आकडेवारी पाहता मुंबईसारख्या कोट्यवधी नागरिकांच्या शहरात अल्प कारवाई दिसून येते. कोविडनंतर मुंबईतील कोटपा कारवाया थंडावल्याचे मुंबईत तंबाखूविरोधी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 

मुंबईत मोठ्या प्रमाणात शाळा - कॉलेज परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होताना दिसून येत आहे. त्यावर कोटपा कारवाया शासनाने करणे अपेक्षित आहे. मात्र त्या कारवाया होताना दिसत नाही . त्यामुळे विक्री वाढल्यास विद्यार्थी व युवकांचे भविष्य धोकादायक होऊ शकते.- अमोल स. भा. मडामे, चिटणीस, नशाबंदी मंडळ

राज्यातील तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा अहवाल -

१)तंबाखूमुक्त केंद्राची संख्या- ४१०

२) नोंदणी झालेल्या रुग्णांची संख्या- ३,९६,८२६ 

टॅग्स :मुंबईचेंबूरमाहीमधारावीकुर्ला