Join us  

सुट्ट्या लागल्या रे.... कडक उन्हामुळे शाळांना उद्यापासूनच सुट्टी; नवं परिपत्रक जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 9:19 PM

राज्यात काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे.

मुंबई - राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना २१ एप्रिल म्हणजे उद्यापासूनच उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदा राज्यातील शाळांना २ मे पासून सुट्टी जाहीर झाली होती, ही सुट्टी १४ जूनपर्यंत असणार आहे. तर, विदर्भातील शाळा मात्र उन्हाळ्याची तीव्रता पाहता ३० जूनपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. शिक्षण विभागाने परिपत्रक जारी करत यासंदर्भात माहित दिली होती. मात्र, वाढत्या उन्हाचा कहर पाहता याच आठवड्यापासून शाळांना आता उद्या २१ एप्रिलपासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अहवाल मागवले होते, त्यानंतर, त्यांनी उद्या २१ एप्रिलपासून शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, शिक्षण विभागाचे नवीन परिपत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. 

राज्यात काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे, प्रतिबंधनक उपाय म्हणून राज्य मंडळाच्या सर्वच शाळांना उद्या २१ एप्रिलपासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास किंवा शाळांचे महत्त्वाचे काम शैक्षणिक काम असल्यास तत्सम शाळा प्रशासनाने स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, असे शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे. तसेच, विदर्भ वगळता राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरु होतील. विदर्भात ३० जूनपर्यंत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सहसचिव इ.मु.काझी यांच्या सहीने नवीन परिपत्रक काढण्यात आलं आहे. त्यानुसार, शाळांना उद्यापासूनच सुट्टी जाहीर झाली आहे.  

शिक्षणमंत्र्यांनी दिली होती पूर्वसूचना

दरम्यान, शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी काढलेल्या पत्रकानुसार, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी लागू होणार आहे. २ मे पासून सुरू झालेली उन्हाळी सुट्टी ही १४ जूनपर्यंत असणार आहे. तर, राज्यभरातील नव शैक्षणिक वर्ष हे जून महिन्याच्या दुसऱ्या सोमवारपासून म्हणजेच १२ जून पासून सुरू केले जाणार आहे. तर. विदर्भातील कडक उन्हाळा लक्षात घेता त्या भागातील नवं शैक्षणिक वर्ष हे जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सुरू होईल. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी खारघरमध्ये झालेल्या दुर्घटनेत उष्माघातामुळे १४ जणांचा मृत्यू झाला. राज्य सरकारने या घटनेची गंभीरतेनं दखल घेतली आहे. त्यामुळेच, आता उन्हाळी सुट्टी याच महिन्यात जाहीर केली जाईल. कदाचित आजपासूनच उन्हाळी सुट्टी देण्यात येईल, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.  

 

टॅग्स :शाळादीपक केसरकर विद्यार्थीउष्माघात