Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांची झाली कासवे... मुंबईची रस्ते वाहतूक पाण्यात; खड्यांत साचले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 05:40 IST

पावसाचा मारा, त्यात रुळांना तडा; ९४ हून अधिक लोकल फेऱ्या रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दक्षिण मुंबईपासून ठाण्यासह दहिसरपर्यंत गुरुवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत पडलेल्या जोरदार पावसाने मुंबईच्या रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला. रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि पावसामुळे निसरडे झालेले रस्ते त्यामुळे वाहतूक मंदावली होती. काही ठिकाणी तर वाहनांची कोंडी झाली होती. रात्री उशिरापर्यंत थोड्या-बहुत  असेच चित्र मुंबईभर होते. 

पूर्व उपनगरांत सायनपासून ठाण्याला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गापर्यंतच्या कुर्ला डेपो, शीतल सिग्नल, कमानी सिग्नल परिसरात सकाळी आणि दुपारी वाहनांची कोंडी झाली होती. दुपारी दोनदरम्यान बीकेसीमधील बहुतांशी ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. अंधेरी-कुर्ला रोडवर काळे मार्ग, जरीमरी, साकीनाका येथे सकाळी वाहतूक कोंडी होती. एस.व्ही. रोडवरही बहुतांश ठिकाणी वाहनचालक कोंडीने त्रस्त झाले होते. सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवर कुर्ला डेपो पुलावरही वाहतूक खोळंबली होती.  

चुनाभट्टी येथील अण्णा भाऊ साठे पूल मार्गावर डंपरमधून खडी पडल्यामुळे डायमंड गार्डन प्रियदर्शिनी येथे वाहतूक मंदावली. अंधेरी भुयारी मार्गाजवळ १ ते १.५ फूट पाणी साचल्याने भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे वाहतूक तिवारी चौक ते अंधेरी स्थानकाकडे वळविण्यात आली. 

पावसाचा मारा, त्यात रुळांना तडा; ९४ हून अधिक लोकल फेऱ्या रद्द

वेगाने वाहणारे वारे, कमी झालेली दृश्यमानता आणि मुसळधार पावसामुळे गुरुवारी पहाटेपासून मध्य रेल्वेच्या मेन लाईनसह हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. लोकल वाहतूक विलंबाने होत असल्याने प्रशासनाला ९४ हून अधिक लोकलफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे चाकरमानी सकाळी कार्यालयात आणि सायंकाळी घरी चिंब होऊन उशिरा पोहोचले. 

पावसामुळे विक्रोळी आणि कुर्ल्यानजीक रुळांवर साचलेल्या पाण्यामुळे लोकल वाहतूक धिम्या गतीने धावत होती. पावसाचा मारा दुपारी सुरू असेपर्यंत मध्य रेल्वे मार्गावरील लोकल २५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. दुपारी लोकल विलंबाने धावत असल्याने मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर रेल्वे मार्गांवरील सर्वच स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.  सकाळी उशिराचा गोंधळ सुरू असतानाच सायंकाळी ६:१५ वाजता विक्रोळी आणि घाटकोपरदरम्यान अप लाईनवर रेल्वे रुळाला तडा गेल्याने प्रवाशांच्या हालात भर पडली. 

ताम्हिणी घाट वाहतुकीसाठी बंद

माणगाव : बुधवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाटात माणगाव आणि मुळशी तालुक्यांच्या हद्दीमध्ये तीन ठिकाणी दरड कोसळली. त्यामुळे रस्त्यावर माती आल्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. ताम्हिणी घाटात गुरुवारी सकाळी ५ ते ५:१५ वाजताच्या दरम्यान दरड कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलिस, महसूल विभागातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.  त्यांनी दरडीची माती दूर करण्याचे काम सुरू केले. पाच ते सहा ठिकाणी रस्त्यावर माती आली असून अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडली आहेत. मुळशी हद्दीमध्येसुद्धा दरड कोसळली. त्यामुळे पुणे-कोलाड रस्ता व ताम्हिणी घाट वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. दरड हटविण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती माणगाव तहसीलदार विकास गारुडकर यांनी दिली.

 

टॅग्स :पाऊसमुंबईमोसमी पाऊस