घाटकोपरमध्ये पायलटच्या प्रसंगावधानामुळे दाट वस्तीतील हाहा:कार टळला; पाच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 07:06 AM2018-06-29T07:06:10+5:302018-06-29T07:06:22+5:30

मृत्यू समोर असताना केला इतरांचा विचार : विमान कोसळते आहे हे लक्षात येताच पायलटने कौशल्य पणाला लावून

Due to pilots' disenchantment in Ghatkopar, the car was deficient; Five killed | घाटकोपरमध्ये पायलटच्या प्रसंगावधानामुळे दाट वस्तीतील हाहा:कार टळला; पाच ठार

घाटकोपरमध्ये पायलटच्या प्रसंगावधानामुळे दाट वस्तीतील हाहा:कार टळला; पाच ठार

जेथे दाट मनुष्यवस्ती नाही असा भाग निवडला आणि घाटकोपर पश्चिमेतील टेलिफोन एक्सचेंजजवळील जीवदया गल्लीत इमारतीचे काम सुरू असलेल्या साइटवर क्रॅश लँडिंग केले. त्यातील चौघांचाही मृत्यू झाला. पण घाटकोपरमधील इतरांचे प्राण वाचले.

मुंबई : चाचणीसाठी उडवण्यात आलेले खाजगी विमान घाटकोपर येथे भरवस्तीत कोसळून पायलट, तंत्रज्ञ आणि पादचाऱ्यासह पाच जणांचा मृत्यू झाला.
दाटीवाटीच्या परिसरात ही दुर्घटना घडल्याने मोठी जीवीतहानी होण्याची भीती होती. मात्र, पायलट प्रदीप राजपूत यांनी त्याही स्थितीत प्रसंगावधान दाखवत हे विमान निवासी इमारतीऐवजी काम सुरू असलेल्या ठिकाणी उतरवण्याचा प्रयत्न केल्याने मोठी दुर्घटना टळली.
हवामान खराब असल्याने मारिया यांनी विमानाच्या चाचणीला विरोध केला होता. त्यानंतरही त्यांना चाचणी घेण्यास भाग पाडले, असा आरोप त्यांचे पती प्रभाग कथुरिया यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. त्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. दरम्यान, दुर्घटनास्थळी विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ सापडला असून त्यातून दुर्घटनेच्या कारणांचा वैमानिक, सहवैमानिकांच्या संभाषणाचा ाणि त्यांनी कंट्रोल रूमला पाठवलेल्या संदेशांचा तपशील समजेल.
यू वाय एव्हिएशन प्रा. लि. चे किंग एअर सी-९० व्हीटी-यूपीझेड असे हे विमान आहे. ते उत्तर प्रदेश सरकारच्या मालकीचे होते. पण अलाहाबादमध्ये त्याला अपघात झाल्याने त्या सरकारने ते यू वाय एव्हिएशन कंपनीला विकले होते. त्यानंतर ते हँगरमध्येच होते, पण नुकतीच त्याची दुरूस्ती करण्यात आली आणि गुरूवारी दुपारी दीडच्या सुमारास जुहू विमानतळावरून ते चाचणीसाठी उडवण्यात आले. त्यावेळी त्यात वैमानिक कॅप्टन प्रदीप राजपूत, महिला सहवैमानिक कॅप्टन मारिया झुबेर, इंजिनियर सुरभी आणि तंत्रज्ञ मनीष पांडे होते. उडवल्यानंतर अवघ्या सहा मिनिटांतच ते कोसळले. विमान उडवताक्षणी त्यातील दोष लक्षात आल्याने ते लगेच माघारी फिरवण्याचा प्रयत्न झाला. जुहूचा विमानतळही गाठणे कठीण होईल, याचा अंदाज आल्याने मुंबई विमानतळाला आपत्कालीन संदेश देण्यात आला. तेथील धावपट्टी या विमानासाठी खुली करण्याचा संदेश देत त्यावरील वाहतूक शेजारच्या धापवट्टीवर वळवण्यात आली. पण धावपट्टीवर जाण्यापूर्वीच ते कोसळले. विमान कोसळते आहे हे लक्षात येताच मारिया यांनी त्यांच्या सर्व कौशल्याचा वापर करत त्यातल्या त्यात जेथे दाट मनुष्यवस्ती नाही असा भाग निवडला आणि घाटकोपर पश्चिमेतील टेलिफोन एक्सचेंजजवळील जीवदया गल्लीमध्ये इमारतीचे काम सुरू असलेल्या साईटवर ते कोसळले.
कोसळताना बांधकामाचे पत्रे, फलक फोडत ते जमिनीवर बांधकामाच्या पिलरवर पडले. त्यामुळे त्यातील चौघांचाही मृत्यू झाला, पण मोठी जीवितहानी टळली. विमान कोसळताच प्रचंड स्फोट झाला आणि क्षणभर त्या भागातील रहिवाशांना काय झाले आहे तेच कळेना. स्फोटाचे आवाज, धूर आणि त्याचवेळी कोसळत असलेला पाऊस यामुळे काही मिनिटांनंतर विमान कोसळल्याचे समजले आणि मदतीसाठी धावपळ सुरू झाली. विमान कोसळतानाच त्याला आग लागल्याने त्यातील इंधन उडाले. पावसाच्या पाण्यासोबत ते वाहात रस्त्यावर आले आणि त्याने पेट घेतला. त्यावेळी तेथून पावसाच्या पाण्यातून जात असलेले पादचारी गोविंद पंडित क्षणार्धात आगीच्या लोळात सापडले आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला; तर लवकुश कुमार, महेशकुमार निषाद व प्रशांत महाकाल यात जखमी झाले. त्यांच्यावर राजावाडी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

...ती चाचणी अखेरचीच ठरली!
उत्तर प्रदेश सरकारच्या मालकीचे हे विमान २०१४ मध्ये पराग कोठारी यांच्या यू वाय एव्हिएशन या कंपनीला विकण्यात आले होते. उत्तर
प्रदेश सरकारच्या ताब्यात असताना या विमानाला अलाहाबाद येथे अपघात झाला होता. या अपघातानंतर उत्तर प्रदेश सरकारने हे विमान विकले. यू वाय एव्हिएशन कंपनी विमाने भाड्याने देण्याचे किंवा तशी सेवा देण्याचे काम करते. त्यांच्या ताब्यात आल्यावरही दीर्घकाळ हे विमान पडून होते. या विमानाची दुरूस्ती केल्यानंतर चाचणीसाठी गुरूवारी दुपारी या विमानाने जुहू विमानतळावरून उड्डाण केले. उड्डाणावेळी विमानात वैमानिक, सहवैमानिक, तंत्रज अशा चार व्यक्ती होत्या. चाचणी झाल्यावर काही वेळातच हे विमान जुहूच्या धावपट्टीवर उतरणार होते. मात्र अवघ्या काही मिनिटांतच त्यातील तांत्रिक बिघाडामुळे इर्मजन्सी लॅँडिंगसाठी वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या २७ क्रमांकाच्या धावपट्टीवर उतरण्याची परवानगी मागितली. आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन तशी परवानगी देण्यात आली होती. मात्र धावपट्टीपासून सुमारे एक मैल अंतरावर असतानाच वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण
सुटले व त्यातून ही दुर्घटना घडल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली.

तिघांवर उपचार सुरू
या विमान अपघातात महिला वैमानिक कॅप्टन मारिया झुबेरी, कॅप्टन प्रदीप राजपूत, इंजिनियर सुरभी आणि तंत्रज्ञ मनीष पांडे यांचा मृत्यू झाला. पादचारी गोविंद पंडित यांनाही या दुर्घटनेत जीव गमवावा लागला. लवकुश कुमार, महेशकुमार निषाद व प्रशांत महाकाल हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर राजावाडी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुरावे गोळा करण्याचे काम : दुर्घटनेची माहिती कळताच मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), एअरक्राफ्ट रेस्क्यू अ‍ॅन्ड फायरफायटिंग (एआरएफएफ) यांची पथके घटनास्थळी पोचली. आग विझवणे, मदतकार्य करणे आणि पुढील चौकशीसाठी पुरावे जमा करण्याचे काम त्यांनी हाती घेतले.

आरोप : वाईट हवामानातही चाचणी
हवामान वाईट असल्याने सहवैमानिक मारिया यांनी विमानाच्या चाचणीला विरोध केला होता. त्यानंतरही चाचणी घेण्यास भाग पाडले, असा आरोप त्यांचे पती प्रभाग कथुरिया यांनी केला. विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ सापडला आहे.

चौकशीचे आदेश
या दुर्घटनेबाबत केंद्रीय हवाई
वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी दु:ख व्यक्त केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास त्वरित तपास सुरू करण्याचे निर्देश नागरी हवाई वाहतूक महासंचालकांना दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चौकशी करू, असे सांगितले.

बघ्यांची प्रचंड गर्दी अग्निशमन दलाला या दुर्घटनेची माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. पण दुर्घटनास्थळी बघ्यांची, स्फोटाच्या आवाजामुळे घरातून बाहेर पळालेल्या नागरिकांची प्रचंड
गर्दी झाली. रस्त्यांत ठिकठिकाणी वाहनांची कोंडी झाली होती. त्यामुळे मदतपथके घटनास्थळी पोचण्यात अडथळे येत होते.

इंधनाचा भडक्यात एकाचा मृत्यू
विमान कोसळताना त्याला आग लागल्याने त्यातील इंधन उडून पावसाच्या पाण्यासोबत वाहत रस्त्यावर आले आणि त्याने पेट घेतला. त्यावेळी तेथून जाणारे गोविंद पंडित आगीच्या लोळात सापडले. त्यांना जीव गमवावा लागला, तर लवकुश कुमार, महेशकुमार निषाद व प्रशांत महाकाल जखमी झाले.
त्यांच्यावर राजावाडी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Due to pilots' disenchantment in Ghatkopar, the car was deficient; Five killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.