मुंबई: केंद्राकडून अपेक्षित लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने मुंबईतील लसीकरण मोहीम पुन्हा थंडावली आहे. लसींचा साठा मर्यादित असल्याने गुरुवारी दिवसभरात केवळ ४५ हजार नागरिकांना लस मिळाली. सरकारी आणि पालिका केंद्रावर तर केवळ १५ हजार नागरिकांना डाेस मिळू शकले. तर अनेकांना डोस न घेताच घरी परतावे लागले. दरम्यान, लसींचा साठा शिल्लक नसल्याने शुक्रवारी लसीकरण मोहीम बंद राहणार आहे.मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत ५९ लाख २९ हजार १९० नागरिकांनी लस घेतली आहे. गेले काही दिवस लसींचा साठा सुरळीत सुरू असल्याने दररोज सरासरी एक लाखाहून अधिक नागरिकांना लस मिळत होती; मात्र या आठवड्यात केंद्राकडून मर्यादित साठा उपलब्ध झाल्यामुळे लसीकरण मोहीम थंडावली आहे. गुरुवारी काही मोजक्याच पालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात आले.
पुरेशा लस साठ्याअभावी आज अनेक ठिकाणी लसीकरण बंद, पालिका आणि सरकारी केंद्रात पुरवठा नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 07:44 IST