Join us

मुंबईकरांनो... घरी जाताय; रस्त्यांवर पावसाचे पाणी साचलेय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 18:48 IST

ओडिशा येथील किनारपट्टीवर आलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम किनारपट्टीवर मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे.

मुंबई : ओडिशा येथील किनारपट्टीवर आलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम किनारपट्टीवर मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. यामुळे मुंबईसह परिसरात कालपासून संततधार सुरू झाली असून दादर, सायनमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. घरी जाण्याच्या वेळेतच पाणी साचू लागल्याने वाहनचालकांना त्रास होणार आहे. 

मुंबईमध्ये दादरच्या हिंदमाता चौकामध्ये जवळपास गुडघाभर पाणी साचले आहे. तर सायनच्या किंग सर्कललाही पावसाचे पाणी साचू लागले आहे. यामुळे प्रशासनाने वाहन चालकांना ठाण्याला जाण्यासाठी उजव्या बाजुला वळण्यास सांगण्यात आले आहे. तसेच वाशीला जाण्याऱ्यांसाठी अरोरा जंक्शनवरून वडाळा पुलाचा वापर करण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. 

गेल्या २४ तासांत , १९० मिलीमीटर पाऊस ठाण्यात झाला आहे. तर रत्नागिरीत 136 मिमी, अलिबाग 133 मिमी, सांताक्रुझ 131 मिमी, महाबळेश्वर 41 मिमी, सोलापूर 35 मिमी तर नागपुरात 30 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत तसेच कोकणात पुढील 4 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

पुढील आणखी ४८ तास कोकण आणि गोवा तसेच मुंबई आणि उपनगरांत मान्सून सक्रिय राहील. दरम्यान, विदर्भात एक-दोन मुसळधार सरींसह मध्यम पाऊस पडेल. या काळात मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक आणि मालेगाव या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र पुण्यामध्ये पावसाचे स्वरूप हलके राहील. पुढील २४ ते ४८ तासांत विदर्भालगतच्या मराठवाड्यातील काही भागांत एक ते दोन मध्यम सरींची शक्यता आहे. त्यानंतर, तीव्रता कमी होईल, परंतु विदर्भ, कोकण आणि गोवा येथे अधून मधून पाऊस चालू राहील असं स्कायमेट या हवामान संस्थेने सांगितले आहे. 

टॅग्स :पाऊसमुंबईवाहतूक कोंडी