Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘फनी’मुळे दाहकता ओसरतेय; मुंबईत हलक्या पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 04:27 IST

राज्यात ठिकठिकाणी ढगाळ वातावरण; कमाल, किमान तापमानात किंचित घट

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फनी’ या चक्रिवादळाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रावर पूर्वेकडून वारे वाहत आहेत. या वाऱ्यासह हवामानातील बदलामुळे राज्यात ठिकठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात किंचित अंशी घट नोंदविण्यात येत असल्याचा दावा हवामान खात्याने केला असून, आणखी ४८ तास हीच अवस्था कायम राहील, असा अंदाज वर्तवला आहे. महत्त्वाचे म्हणजे ४ मे रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. गोव्यासह उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भात काही ठिकाणी तर तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती.मराठवाड्याच्या काही भागात तसेच विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून हवामान खात्याने केलेल्या नोंदीनुसार, कमाल आणि किमान तापमानात किंचित अंशी घट नोंदविण्यात आली आहे.

४२ अंश सेल्सिअसच्या घरात नोंदविण्यात येत असलेले कमाल तापमान ४० अंशावर घसरले आहे. विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेचा तडाखा सुरूच असून, येथील बहुतांश शहरांचे कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या घरात नोंदविण्यात येत आहे.

चक्रिवादळ आज किनारपट्टीवर धडकणार

महाशक्तिशाली ‘फनी’ चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीवरील श्रीकाकुलम, विजयानगरम आणि विशाखापट्टणम जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. ३ मे रोजी दुपारी वादळ ओडिशाच्या गोपालपूर आणि चंदबली दरम्यान किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. विशाखापट्टणम आणि मछलीपट्टणम इथल्या रडारद्वारे ‘फोनी’वर लक्ष ठेवण्यात येत आहे.

राज्यासाठी अंदाज : ३ आणि ४ मे - कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. ५ आणि ६ मे - गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील..

मुंबईसाठी अंदाज३ मे - आकाश अंशत: ढगाळ राहील.४ मे - आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल

टॅग्स :फनी वादळओदिशामुंबईपाऊस