Join us  

दिवाळी सणानिमित्त... बाहेरगावाहून आलेल्या एसटी चालक-वाहकांना फराळाचे वाटप..! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 2:50 PM

दिवाळी सणांमध्ये आपल्या घरापासून नोकरीनिमित्त दूर राहून प्रवाशांची अखंड सेवा करणाऱ्या एसटीच्या चालक वाहकांना मायेची ऊब देणारा "दिवाळी फराळ" वाटपाचा उपक्रम गेली 34 वर्षे एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारात राबविला जात आहे.

मुंबई  : दिवाळी सणांमध्ये आपल्या घरापासून नोकरीनिमित्त दूर राहून प्रवाशांची अखंड सेवा करणाऱ्या एसटीच्या चालक वाहकांना मायेची ऊब देणारा "दिवाळी फराळ" वाटपाचा उपक्रम गेली 34 वर्षे एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारात राबविला जात आहे. आगारातील स्थानिक कर्मचारी वर्गणी गोळा करून स्वखर्चाने फराळ विकत आणतात, दिवाळीच्या पहिल्या दिवशी बाहेरगावावरून बसेस घेऊन आलेल्या चालक-वाहकांना अतिशय स्नेह भावनेने फराळ वाटप करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात.

सालाबाद प्रमाणे यंदाही आगार व्यवस्थापक सुनिल पवार यांच्या हस्ते कर्तव्यावर असलेल्या बाहेरगावाहून कामगीरी निमित्त आलेल्या चालक-वाहकांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. सणासुदीला कुटुंबापासून दूर  नोकरीनिमित्त काम करणाऱ्या चालक-वाहकांना सण व उत्सवाची उणीव भासू नये म्हणून गेली 34 वर्षे नित्य नेमाने फराळ वाटपाचा हा उपक्रम राबविला जातो या उपक्रमातून एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये स्नेह भावाची भावना वाढीस लागते एकत्र काम करत असताना सहकारी कर्मचाऱ्यांच्या प्रेरणा बनवून त्याला प्रोत्साहित करण्याची सुवर्ण संधी या निमित्ताने साधली जाते.

एसटी प्रशासन सांघिक कामगिरीच्या जोरावर उत्पन्न वाढविन्याण्यासाठी  सदैव प्रयत्न करते. या पुढे सुध्दा उत्पन्न वाढीसाठी सर्वांनी  प्रयत्नशील रहावे असे आवाहन आगार व्यवस्थापक पवार यांनी या वेळी  केले. तसेच प्रवासी सेवेचा आनंद एसटी कर्मचाऱ्यांनी घेत असतानाच , सर्वसामान्य जनतेची दिवाळी उत्साहात व आनंदी वातावरणात साजरी होण्यासाठी त्यांना एसटीच्या सुरक्षित व सुखकर प्रवासाची हमी  द्यावी. अशी भावनाही त्यांनी  या वेळी व्यक्त केली. या वेळी प्रभारक श्रीरंग  बरगे, प्रल्हाद भांडवलकर, वाहतूक निरीक्षक सतीश लिपारे, लेखकार, तेजश्री पाखरे, वरिष्ठ लिपिक, सुनील निरभवने, वाहतूक नियंत्रक मनोज सोनवणे , महेश जाधव, प्रमुख कारागीर, गणेश मामिडवार  हे उपस्थित होते.

टॅग्स :राज्य परीवहन महामंडळमहाराष्ट्रदिवाळी